Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : ...तर राज्यातील टोल नाके जाळून टाकू; राज ठाकरेंचा सरकारला गर्भित इशारा

Maharashtra Toll And Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलतात

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : 'टोलमुक्त महाराष्ट्र करू असे ढोल वाजवणाऱ्या सर्व नेत्यांच्या पक्षांनी सत्ता भोगलेली आहे. मनसेने २००९-१० पासून टोलबंदसाठी आंदोलन सुरू केले. त्या दबावातून काही टोल बंद केले. आता फडणवीस म्हणतात की टोलवर चारचाकी, तीनचाकी वाहनांना टोल नाही. मात्र, ते धादांत खोटे बोलतात. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर राज्यातील प्रत्येक टोलवर मनसेकडून पाहणी केली जाईल. त्यावेळी लहान वाहनांकडून वसुली झाली, तर टोल नाके जाळून टाकण्यात येतील,' असा गर्भित इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. (Latest Political News)

मुंबईत टोल आंदोलनाच्या दिशेबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे (Raj Thackeray) बोलत होते. या वेळी त्यांनी टोलवसुलीबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, 'सत्तेतील प्रत्येक नेत्याने प्रत्येक वेळेला टोलमुक्त महाराष्ट्र करू, असा शब्द दिला आहे. त्या सर्वांची सरकारे आलेली आहेत. मात्र, राज्यातील रस्ते टोलमुक्त झालेले नाहीत. टोलच्या माध्यमातून जमा होणारा रोख पैसा सत्ताधाऱ्यांना रोज, आठवड्याला, महिन्याला मिळतो. त्यामुळे टोल हे सरकारचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे,' असा घणाघात ठाकरेंनी केला.

ठाण्यातील पाच टोलवरील दरवाढीविरोधात मनसेच्या अविनाश जाधवांनी उपोषण केले होते. ते सोडवल्यानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी टोलबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सर्व टोलवर लहान वाहनांकडून टोलवसुली होत नसल्याचे सांगितले. यावर ठाकरे म्हणाले, 'फडणवीस सांगतात त्यापेक्षा ठिकठिकाणचे चित्र वेगळे आहे. एकतर फडणवीस धादांत खोटे बोलतात, नाहीतर टोल ठेकेदार नागरिकांची लूट करतात, असा अर्थ होतो,' असा आरोपही ठाकरेंनी केला. (Maharashtra Political News)

नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळत नसतील, तर टोलवर जमा झालेला पैसा कुठे जातो, असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. ते म्हणाले, 'टोल हा राज्यातील सर्वात मोठा स्कॅम आहे, हे आता स्पष्ट झालेले आहे. राज्यातील सर्व टोल नाक्यांची मनसेकडून तपासणी केली जाईल. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे कार, तीनचाकी वाहनांना टोल लागला तर सर्व टोल नाके जाळून टाकू. त्यानंतर सरकारने काय करायचे ते करावे,' असा इशाराच ठाकरेंनी दिला आहे.

आगामी लोकसभा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेने राज्यभर स्वतंत्रपणे तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यांवरून मनसे राज्यात आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत आहे. यातच ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यामुळे महायुतीतील पक्षांचे टेन्शन वाढणार आहे, यात काही शंका नाही.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT