Amit Shah| Raj Thackeray | Narendra Modi  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Big Announcement : राज ठाकरेंची मोठी घोषणा; ...म्हणून मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा!

Deepak Kulkarni

Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता.9)गुढीपाडवा मेळाव्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर सडकून टीका केली. त्यात त्यांनी निवडणूक आयोगापासून ते उद्धव ठाकरे तसेच महायुती, महाविकास आघाडीतील जागावाटपावर थेट भाष्य केले. या मेळाव्यात राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली.यात त्यांनी नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी शिवतीर्थावर झालेल्या आजच्या मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात अनेक धक्कादायक खुलासे केले. यात त्यांनी दिल्ली दौरा, अमित शाहांची भेट,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसह जागावाटप फॉर्म्युला यांसह अनेक बाबींचा समावेश आहे.पण याच मेळाव्यात त्यांनी मनसे महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरे म्हणाले, ही 2024 ची लोकसभा निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी असून मला या राजकीय वाटाघाटींमध्ये पडायचं नाही.आणि या देशाचं नेृतत्व भक्कम हातात असायला हवं. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. या बदल्यात आम्हांला राज्यसभा नको, बाकीच्या कोणत्याही वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) आहे, अशी मोठी घोषणा राज ठाकरेंनी यावेळी केली.

'...म्हणून अमित शाह यांना फोन केला!'

या मेळाव्यात राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं आणि ही भेट का घेतली याबाबत थेट भाष्य केलं. ते म्हणाले, गेले वर्ष- दीड वर्ष झाली, मुख्यमंत्री माझ्याशी बोलतात. आपण एकत्र आलं पाहिजे. एकत्र काही तरी केलं पाहिजे.? पण हे असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय.तिकडे देवेंद्र फडणवीसही सांगत होते. एकत्र आलं पाहिजे. म्हटलं म्हणजे काय. मग त्यात विषय निघाले. म्हणून अमित शाह यांना फोन केला आणि म्हटलं मला भेटायचं. काय चाललंय मला समजायचं आहे. मग आमचं बोलणं झालं. इथे बोलणं झालं. निशाणीवर प्रकरण आलं.

तर टोकाचं प्रेम करतो!

मी महाराष्ट्रावर प्रेम करतो, महाराष्ट्रावर माणसांवर टोकाचं प्रेम करतो. त्याचप्रमाणे मी एखाद्यावर विश्वास टाकला तर टोकाचं प्रेम करतो आणि तो विश्वास तोडला तर टोकाचा विरोध करतो. त्यामुळेच 2019 मध्ये ज्या भूमिका पटल्या नाहीत त्यासाठी मी 'लावे रे तो व्हिडीओ'मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या-ज्या वेळी मोदी सरकारने चांगलं काम केलं त्यावेळी मी त्यांचं अभिनंदन केलं. 370 हटवल्यानंतर अभिनंदन करणारं माझंचं पहिलं ट्विट होतं. तसेच एनआरसीच्या बाजूने मी मोर्चाही काढला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी राज ठाकरेंनी राज्यात ज्या काही मनसेवरून चर्चा झाल्या त्या खोडून काढल्या. ते म्हणाले, वृत्तपत्रातून शिवसेनेत मनसे विलीन करण्याच्या ज्या काही बातम्या आल्या त्या खोट्या असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, शिवसेनेचा(Shivsena) प्रमुख व्हायचे असते तर मी सुरुवातीलाच झालो असतो. त्यावेळी माझ्याकडे जवळपास ३२ आमदार, सहा-सात खासदार होते. त्यांनी आपण एकत्र बाहेर पडू असे सांगितले होते. त्यावेळी मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नाही. उद्या काय करायचे झाले तर स्वतःचा पक्ष काढेन. ती माझ्या मनाशीच खुणगाठ बांधली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT