Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance sarkarnama
मुंबई

MNS Shivsena UBT Alliance : आता संभ्रम नको, राज ठाकरेंनी स्वतः समोर येऊन..., युतीबाबत ठाकरे गटाची रोखठोक भूमिका

Uddhav and Raj Thackeray brothers unity : "उद्धव आणि राज ठाकरे 5 जुलै रोजी मराठी विजय सोहळ्यांत एकत्र आले. दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे, पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही. मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जसेच्या तसे आहेत. हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही."

Jagdish Patil

Mumbai News, 13 Jul : 'आता संभ्रम नको', असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंची एकी होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. तसंच या रोखठोक सदरातून त्यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत.

उद्धव आणि राज ठाकरे 5 जुलै रोजी मराठी विजय सोहळ्यांत एकत्र आले. दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे, पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही. मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जसेच्या तसे आहेत. हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही.

ती युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल, अशा शब्दात राऊतांनी लवकरच राज ठाकरेंनी युतीबाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी पुढे लिहिलं की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील. मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत.

त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल व आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची सगळ्यांत जास्त भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटत आहे असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिवाय एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होउन लगेच दिल्लीत गेले. त्यांचे गुरू अमित शहांना भेटल्याचा दावा शिंदे यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते थांबवा. फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही.”

यावर अमित शहा यांनी विचारले, “काय करायचे?” त्यावर शिंदे म्हणाले, “मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो. मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गारंटी देतो.” शहा-शिंदे यांच्यात ही चर्चा झाली व अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू असल्याचा मोठा दावा त्यांनी रोखठोकमधून केला आहे. दरम्यान, मुस्लिम समाजाबद्दल एकेकाळी नव्हता त्यापेक्षा जास्त रोष मुंबई-महाराष्ट्रात गुजराती, जैन समाजाबद्दल उफाळून येत आहे.

तो अमित शहांच्या महाराष्ट्रद्वेष्टय़ा राजकारणामुळे. हा संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हय़ात, शहरात बाहेर पडेल असेच चित्र आहे. मीरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांच्या मुजोरी विरुद्ध मराठी लोकांनी प्रचंड मोर्चा काढला. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले मंत्री प्रताप सरनाईक यांना लोकांनी पळवून लावले. या मोर्चाच्या गर्दीत व आयोजनात शिवसेना होती, पण मुख्यमंत्री फडणवीस ‘मनसे’चे नाव घेत राहिले व शिवसेनेचे नाव घेण्याचे टाळले.

त्यामागचा कावा अनाजीपंतांचा आहे व तो दोन्ही ठाकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीचे मन साफ नाही, हेच त्यातून दिसले, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर देखील टीका केली. शिंदे, फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जातात. राज ठाकरे त्यांचे स्वागत करतात.

शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औटघटकेच्या फौजदारासारखे आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटून राजकीय हवा गरम करतात. शिंदे यांचीच हवा सध्या संपल्याने त्यांच्या भेटीगाठी फुसक्या आहेत व या दोघांमुळे सध्याची मराठी एकजूट संपेल असे वाटत नाही. एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन या सगळ्यांवर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.

शिवाय ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मराठी एकजूट टिकली नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे. मुंबई पूर्णपणे अदानी-लोढा वगैरेंच्या घशात जाईल व एक दिवस मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही. लढवय्या मराठी जनतेला मोगल काळातील ‘खोजे’ बनवण्याचा उपक्रम सुरू आहे. राज्यावर ‘खोजे’ मंडळींचेच राज्य आहे. या खोज्यांना मराठी माणसांची एकजूट नको, ठाकरे बंधूंनी एकत्र येणेही नको. हे सर्व व्यापाऱ्यांचे मनसुबे उधळले जातील. महाराष्ट्राचे पुण्य आणि 106 हुतात्म्यांचा त्याग कामी येईल, असाही विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT