Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

MNS Loksabha Election : लोकसभेसाठी मनसेची तयारी सुरू; राजू पाटलांच्या विधानाने शिंदे गट, भाजपचे धाबे दणाणले

शर्मिला वाळुंज

Mumbai Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात राज्यात मोठी चुरस रंगणार आहे. पक्षफुटीनंतर जागा ताब्यात येण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते एक-एक मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. सर्व पक्ष तयारीला लागले असताना राज ठाकरे यांचा मनसेही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच मनसेचे आमदार राजू पाटलांनीही लोकसभेसाठी आमची तयारी सुरू आहे, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याने ठाण्यातील शिंदे गट तर मुंबईतील भाजपचे धाबे दणाणले आहेत. (Latest Political News)

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय लढत चांगलीच रंगलेली पाहायला मिळेल. देशात एनडीए विरुद्ध इंडिया ही लढत असेल तर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आहेत.

या पक्षात सध्या जागावाटपासाठी स्पर्धा रंगली असून, प्रत्येक पक्षातील वरिष्ठ नेते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तेथील आढावा घेऊन पक्षाची पकड आणि कोणाची ताकद जास्त याचा अभ्यास करत आहेत. त्यातच आता मनसेनेही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. मनसेने स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.

एकीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिंदे गट असे वातावरण आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी आपापसात समेट करत कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदेच असतील, असे म्हणायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील यांचे नाव लोकसभेसाठी पुढे येऊ लागले आहे.

दिवा येथील कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त भावी खासदार असा उल्लेख करत राजू पाटलांना शुभेच्छा दिल्या. उल्हासनगरमध्ये तसे बॅनरही झळकले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही, 'पाटील यांनी कंबर कसली असेल तर त्यांना शुभेच्छा,' असे म्हटले आहे. (Maharashtra Political News)

हे सर्व पाहता कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसे आपला खासदारकीचा उमेदवार देणार काय, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे करत आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासमोर राजू पाटील यांना उमेदवारी देऊन राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन देणार का? अशीदेखील चर्चा सुरू आहे.

याबाबत आमदार राजू पाटील (Raju Patil) म्हणाले, "कार्यकर्त्यांना वाटते मी खासदार व्हावे म्हणून त्यांनी बॅनर लावले आणि केक कापला. आम्हालाही वाटते राजसाहेब मुख्यमंत्री व्हावेत, आमचीही भावना आहे. त्यामुळे या गोष्टी होत असतात. राहिला प्रश्न खासदारकी लढायची की नाही? मी दोन लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी आहे, कल्याण आणि भिवंडी. आमची तयारी चालू आहे. आम्ही साहेबांच्या आदेशावर चालणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जो आदेश देतील मानून चालू."

आमदार पाटील यांनी हे विधान केल्याने मनसेची लोकसभेसाठी तयारी सुरू आहे का ? राज्यात किती जागा मनसे लढवणार? मागील विधानसभेचा अंदाज घेता राज ठाकरे काय निर्णय घेतात, काय रणनीती आखतात, याची चर्चा इतर पक्षांत सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT