Ramdas Athawale | Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

Ramdas Athawale: "बाबासाहेबांचं महान स्वप्न होतं..."; आठवलेंकडून सातत्यानं प्रकाश आंबेडकरांना घातली जातेय साद; नव्या पोस्टमुळं पुन्हा चर्चा सुरु

Ramdas Athawale latest post controversy: यापार्श्वभूमीवर यापूर्वी अनेकदा रिपब्लिकन नेत्यांच्या एकीकरणाचे प्रयत्न झाले पण ते अयशस्वी ठरले. आता पुन्हा एकदा यासाठी रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सातत्यानं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना साद घालत आहेत.

Amit Ujagare

RPI and VBA political developments: घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नव्या पक्षाची घोषणा केली होती. पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या प्रेरणेतून नागपूर इथं ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपाइंची स्थापना झाली. एन. शिवराज हे या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. पण त्यानंतर रिपाइंनं अनेक नेते मंडळी घडवली पण नंतर या सर्वच नेत्यांनी आपापले वेगळे सुभे निर्माण केले. त्यामुळं रिपाइंची अनेक शकलं झाली.

महाराष्ट्रातील दलित राजकारणाला म्हणा किंवा बाबासाहेबांच्या विचारांच्या राजकीय स्वप्नांना दलित नेत्यांनीच तिलांजली दिली असल्याची स्थिती अनेक वर्षांपासून बनली आहे. यापार्श्वभूमीवर यापूर्वी अनेकदा रिपब्लिकन नेत्यांच्या एकीकरणाचे प्रयत्न झाले पण ते अयशस्वी ठरले.

आता पुन्हा एकदा यासाठी रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सातत्यानं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना साद घालत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा नवी पोस्ट केल्यानं याची चर्चा सुरु झाली आहे.

आठवलेंची ताजी पोस्ट काय?

रामदास आठवले यांनी ट्विटरवर पोस्ट लिहिली असून यामध्ये यापूर्वी रिपब्लिक ऐक्याचा आराखडा तयार करण्यासाठी मुंबईतील हॉटेल सेंटॉर इथं बैठक पार पडली होती. तत्कालीन खासदार प्रकाश आंबेडकर, रिपाइंचे नेते रामदास आठवले आणि ज्येष्ठ नेते रा. सु. गवई हे एकत्र आले होते, त्यावेळी काढलेला एक फोटो आठवलेंनी ट्विट केला असून त्या अनुषंगानं एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये आठवले म्हणतात, "मी आज केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (RPI) ताकद आज केवळ महाराष्ट्रापुरती उरलेली नाही.

कन्याकुमारीपासून ते थेट कश्मीरपर्यंत आणि अगदी अंदमान-निकोबार बेटांपर्यंत आपल्या पक्षाचा निळा झेंडा मोठ्या दिमाखात फडकतोय. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपला निष्ठावान कार्यकर्ता आणि आपली मोठी हक्काची 'वोट बँक' तयार आहे. पण इतका मोठा विस्तार आणि ताकद असूनही, आपण विखुरलेले असल्यामुळे आपल्या समाजाचे राजकीय नुकसान होत आहे.

बाळासाहेब आपणाला एवढेच सांगतो की तुम्ही सगळ्या जागा लढता, परंतु अजून तुमचा पक्ष राज्यामध्ये रिकग्नाईज होत नाहीये, एवढी मतं मिळत नाहीयेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक महान स्वप्न होते की, "माझा समाज हा केवळ याचक न राहता 'राज्यकर्ती जमात' झाला पाहिजे" जर प्रकाश आंबेडकर आणि आपण सर्व गट एकत्र आलो, तर आपली ही शक्ती अनेक पटींनी वाढेल आणि बाबासाहेबांचे ते स्वप्न आपण अधिक ताकदीने पूर्ण करू शकू"

आठवलेंची ऑफर

दरम्यान, रामदास आठवलेंनी अशा प्रकारे रिपब्लिकन ऐक्यासाठी घातलेली साद ही पहिलीच नाही तर अलिकडच्या काळात अनेकदा त्यांनी प्रकाश आंबेडकरांना यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. जर अशा प्रकारे ऐक्य झालं तर जो पक्ष निर्माण होईल त्याचं प्रमुखपदंही आपणंच भूषवावं अशी ऑफरही त्यांनी आंबेडकर यांना दिली आहे. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करण्यासाठी तयार आहोत असंही आठवलेंनी यापूर्वी म्हटलं आहे. पण काही व्यक्तीगत दुराव्यामुळं प्रकाश आंबेडकरांकडून याकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळणार

पण आता आठवलेंनी नव्यानं घातलेल्या सादेला प्रकाश आंबेडकर प्रतिसाद देतात का? हे पाहावं लागणार आहे. जर याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर महाराष्ट्राच्या आणि केंद्रातील राजकारणाला आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT