

Raigad, 27 February : रायगड जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर होऊन आज तब्बल १९ दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटू शकलेला नाही. महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आघाडीने बहुमत मिळवले आहे. मात्र, शिवसेनाला बाहेर ठेवून या दोन्ही पक्षांकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही.
आता रायगड झेडपीच्या सत्तास्थापनेबाबतची मोठी घडामोड पुढे आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिढा सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात विधीमंडळात बैठक होत आहे. त्या बैठकीकडे कोणता निर्णय होतो, याकडे रायगडवासियांचे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या (Raigad Zilla Parishad) ५९ जागांपैकी सर्वाधिक २१ जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. मात्र, निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने १६, तर भाजपने १५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या आघाडीकडे बहुमत आहे. मात्र, महायुतीमधील तिसरा पक्ष शिवसेनेला वगळून या दोन्ही पक्षांनी सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ०५, तर काँग्रेसने ०२ जागा जिंकल्या आहेत.
कोणत्याही एका पक्षाकडे बहुमत नाही, त्यामुळे सत्तेसाठी दोन्ही पक्षांना एकत्र यावे लागणार आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून विस्तवही जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि शिवसेनेमध्ये उभा दावा आहे, त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत नेत्यांमधील कडवटपणा अडथळा ठरत आहे.
दरम्यान, मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात जाऊन सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. त्या वेळी रायगडसह सांगली, कोल्हापूर, सातारा आणि धाराशिव जिल्हा परिषदेबाबत तोडगा निघेल, अशी चर्चा होती. मात्र, तशा कोणत्याही घडामोडी पुढे घडलेल्या नाहीत, त्यामुळे रायगडसह सहा जिल्हा परिषदांमधील सत्तास्थापनेचा पेच महायुतीमध्ये कायम आहे.
राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या २० मार्चपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे पत्रक ग्रामविकास विभागाने काढले आहे, त्यानंतर या जिल्हा परिषदांमधील सत्ता स्थापनेला वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी महायुतीचे नेते म्हणून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये विधीमंडळात बैठक होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस कोणता तोडगा काढतात, याकडे संपूर्ण रायगडवासियांचे लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे हे तीनही पक्ष सत्तेत एकत्र येणार की शिवसेना विरोधात बसणार, याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.