sharad Pawar-Ranjitsinh Mohite Patil Sarkarnama
मुंबई

Ranjitsinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटील पवारांची भेट न घेताच माघारी का गेले?

Maharashtra Assembly Election 2024 : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे पवारांना न भेटताच निघून गेले, त्यामुळे न झालेल्या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 18 October : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी चक्क वाय. बी. सेंटरला आले होते. मात्र, पवारांना न भेटताचा मोहिते पाटील हे माघारी गेले, त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील नेमके कशासाठी आले होते. तसेच ते पवारांना न भेटताच माघारी का गेले, अशी चर्चा रंगली आहे.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हे लोकसभा निवडणुकीपासून भाजपपासून हळूहळू दूर जाताना दिसत आहेत. तसं म्हणायला ते पुण्यातील भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला पोचले होते. पण, भाजप नेत्यांपेक्षा त्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी उठबस अधिकची आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अकलूज येथील सत्काराच्या कार्यक्रमात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूरच्या (Solapur) विकासासाठी आपण कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार आहे, असे विधान करून राजकीय पक्षांतराचे संकेत दिले होते. त्याचवेळी त्यांची राजकीय दिशा स्पष्ट झाली होती. मात्र, त्यांनी अजूनही भाजपला सोडलेले नाही.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील हे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील हे माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, रणजितसिंह यांनी माढ्याबाबत कधीही सूतोवाच केलेले नाही. पण, मोहिते पाटील हे माढ्यातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे इच्छुकांच्या गाठीभेटी घेत आहेत. मुंबईत ते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये इच्छुकांना भेटत आहेत. त्याचवेळी भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे पवारांना न भेटताच निघून गेले, त्यामुळे न झालेल्या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे वाय. बी. सेंटरवर कशासाठी आले होते आणि पवारांना न भेटताच ते परत का गेले, असा सवाल उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT