Mahadev Jankar Sarkarnama
मुंबई

जानकरांचं ठरलं! बारामतीतून नव्हे, तर या मतदारसंघातून लोकसभा लढवणार

महादेव जानकर यांनी 2014 च्या निवडणुकीत बारामतीत जोरदार टक्कर दिली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) जोरदार टक्कर दिली होती. 2024 च्या निवडणुकीत (Election) ते पुन्हा बारामतीतून लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. पण जानकरांनी आता बारामतीला रामराम केल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यांनी थेट मराठवाड्यात (Marathwada) जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेड येथे माध्यमांशी बोलताना जानकर यांनी याबाबत माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पक्षाकडून अनेक मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त म्हणाले, परभणी, माढा, सांगली या जागांवर आमचा पक्ष स्वबळावर लढणार आहे. मराठवाड्यामध्ये आमची ताकद आहे. त्यामुळे परभणीतील (Parbhani) कार्यकर्त्यांनी मी तिथून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह केला आहे.

माझाही मानस परभणीतून निवडणूक लढवण्याचा आहे. आमचं प्रत्येक जिल्ह्यात खातं कसं उघडेल, याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रशिक्षण शिबीरं सुरू आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही दौर सुरू असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, परभमीमध्ये सध्या शिवेसेनेचे संजय जाधव हे खासदार आहेत. त्यामुळे जानकर थेट शिवसेनेला टक्कर देणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीही ताकद आहे. जाधव यांनी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा पराभव केला होता. परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून जालना जिल्ह्यातील 2 मतदारसंघांचा यामध्ये सहभागी होतो. जालना जिल्हा मतदारसंघातील परतूर येथे भाजपचे बबनराव लोणीकर तर घनसावंगी येथे राजेश टोपे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार टक्कर दिली होती. सुळे यांना केवळ 67 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. जानकर यांनी ऐनवेळी निवडणुकीत उतरून मिळवलेली मतं लक्षणीय होती. त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली असती तर निकाल वेगळा लागला असता अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. मागील काही दिवसांपासून जानकर पुन्हा बारामतीत सक्रीय झाले होते. पण त्यांनी आता परभणीतून लढण्याचा निर्णय घेतल्याने या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT