Ashish Shelar, Rupali Chakankar Sarkarnama
मुंबई

रुपाली चाकणकर म्हणतात, गरज भासल्यास शेलारांना अटक!

आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविषयी केलेलं वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना चांगलंच भोवणार असल्याचे दिसते. पेडणेकर यांच्या तक्रारीवरून शेलारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना शेलार यांच्या वक्तवाबाबतचा अहवाल मागवत गरज भासल्यास अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

वरळीतील बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटात चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये (Shiv Sena) चांगलाच वाद रंगला आहे. पेडणेकर यांनी तक्रारीवरुन शेलार यांच्या विरोधात मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीवर महापौर ठाम होत्या. त्यानुसार पोलिसांनी शेलार यांच्यावर IPC कलन 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शेलार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेलार यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शेलार यांच्या वक्तव्याबद्दल मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे. याविषयी गुरूवारी माध्यमांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या, शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेले वक्तव्य अवमानकारक आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. त्यानुसार गरज भासल्यास आरोपीला अटक करण्यात यावी, असे निर्देश दिल्याचेही चाकणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, शेलार यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये शेलारांनी म्हटलं आहे की, सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे मुद्दाम गुन्हा दाखल केला जात आहे. आपण जे विधान केले नाही. त्याचा विपर्यास करत मुद्दाम गुन्हा दाखल केला, असा आरोप शेलार यांनी पत्रात केला आहे. तसेच त्यांनी गुरूवारी सकाळीही पेडणेकर यांच्यावर आरोप केले. कायदेशीर मार्गाने त्यांना उत्तर दिलं जाईल, असं ते म्हणाले आहेत.

शेलार यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीनेही कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. या संदर्भात नगरसेविका विशाखा राऊत, उपनेत्या मीना कांबळे तसेच मुंबईतील सर्व महिला विभाग प्रमुख खांनी शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT