Devendra Fadnavis-Baba Siddique-Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Baba Siddique : सिद्दीकींच्या हत्येनंतर राऊत संतापले; ‘फडणवीसांची गृहमंत्रिपदावरून हकालपट्टी करा’

Vijaykumar Dudhale

Mumbai, 13 October : महाराष्ट्रात, मुंबईत ज्या पद्धतीने हत्यांचं सत्र सुरू आहे, त्या आता राजकीय नेत्यांपर्यंत पोचल्या आहेत. राज्यात कोण सुरक्षित आहे, हे एकदा राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे. आतापर्यंत आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागत होतो. आता गृहमंत्र्यांची हकलपट्टी करा, असं सांगायची वेळ आली आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.

माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, बाबा सिद्दीकी हे राज्यमंत्री आहेत, ते अनेक वर्षे आमदार, काँग्रेसचे नेते होते. वाय दर्जाची सुरक्षा असताना आणि सोबत अनेक लोक असतानाही मारेकऱ्यांनी त्यांना येऊन गोळ्या घातल्या आहेत.

महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हत्यांचं सत्र सुरू आहे, त्या आता राजकीय नेत्यांपर्यंत पोचल्या आहेत. माजी मंत्री, आमदारांपर्यंत पोचल्या आहेत. राज्यात कोण सुरक्षित आहे, हे एकदा राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे. राज्यात कोण सुरक्षित आहे, सामान्य जनता सुरक्षित नाही. महिला सुरक्षित नाहीत व्यापारी, उद्योगपतीही सुरक्षित नाहीत, असा दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut)केला.

राजकीय कार्यकर्ते, नेते, माजी मंत्री, आमदार सुरक्षित नाहीत. मग गृहखात काय करतं. या राज्याच्या गृहमंत्र्यांनी हरियाणामध्ये भाजपने निवडणुका जिंकला; म्हणून येथे पेढे वाटले. तुम्ही पेढे खा; पण राज्यातील जनतेसमोर दिवसाढवळ्या रक्तपात सुरू आहे. खंडणी वसूल केली जात आहे. अशा वेळेला राज्याच्या गृहमंत्र्यांची काय जबाबदारी आहे की नाही, असा सवाल खासदार राऊतांनी केला.

राऊत म्हणाले, तुरुंगात मारामाऱ्या, दंगली सुरू आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी, निष्क्रिय असे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. आता गृहमंत्र्यांना हाकला त्यांची हकलपट्टी करा, असं सांगायची वेळ आली आहे

देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि आता काय झाले आहेत. त्यांचं अधःपतन आमच्या डोळ्यासमोर झालेलं आम्ही पाहिलं. माझं त्यांना आव्हान आहे की विरोधकांच्या बाबतीत काड्या करण्यापेक्षा रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे, त्या पदाला, कर्तव्य भावनेला जागून काम करा, असा सल्लाही राऊतांनी फडणवीसांना दिला.

बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराची घटना अत्यंत भयंकर आणि दुर्दैवी आहे. आमच्यासारखे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांची सुरक्षा तर पूर्णपणे काढून घेतली आहे. त्याची आम्हाला चिंता नाही, पण हे सूडबुद्धीचे राजकारण आहे. पण बाबा सिद्दिकी हे तुमच्याच आघाडीमध्ये सामील असताना त्यांना सुरक्षा व्यवस्था असताना त्यांना मारण्यात आले.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील कारणे काय आहेत, ते भविष्यात पुढे येतील. पण, सिद्दीकींची हत्या मुंबईतील भरवस्तीत झाली. याच्यावर गृहमंत्र्यांनी खुलासे करत बसू नये, त्यांना जर स्वतःला या संदर्भात काही खंत वाटत असेल, खेद वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा; नाहीतर राज्यपालांनी त्यांच्या राजीनामा मागावा, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT