मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) इतिहासात असे राज्यपाल मी कधी पाहिले नाहीत. आजवरच्या राज्यपालांनी (Governor) महाराष्ट्राचा नावलौकीक वाढविण्याचे काम केले आहे. पण, विद्यमान राज्यपाल हे महात्मा जाेतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची टिंगल करणारे उद्गार काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे. राज्यपालपदावर बसण्याचा त्यांना अधिकार नाही. केंद्र सरकारने राज्यपालांची लवकरात लवकर हकालपट्टी करावी; अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला. (Remove Governor Bhagat Singh Koshyari immediately: Sharad Pawar)
महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महामार्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्या मोर्चात बोलताना पवार यांनी केंद्र सरकारला हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आज राज्याच्या कोनाकोपऱ्यातून तरुणाची शक्ती एकत्र आली आहे. सध्या महाराष्ट्राचा सन्मान, अस्मितांवर हल्ले व्हायला लागले. सतेच्या खुर्चीवर बसलेले लोक महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाद्दल वेगळी भाषा वापरतात, हे सहन केले जाणार नाही.
भारतात अनेक राजे महाराजे झाले. पण साडेतीनशे वर्षांनंतरही सामान्यांच्या मनात एक नाव अखंड आहे, ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपतींबद्दलचा अवमानकारक उल्लेख मंत्री आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित घटक करत आहेत. हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. तुम्ही दिलेला हा इशारा सत्ताधाऱ्यांना समजला नाही तर लोकशाही मार्गाने धडा शिकवायला महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असेही पवार यांनी नमूद केले.
पवार म्हणाले की, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राचे सन्मान, आदाराची स्थाने आहेत. त्यांच्याबद्दल राज्यकर्ते बोलतात. महाराष्ट्राच्या इतिहासात असा बोलणारा गव्हर्नर मी कधी पाहिला नाही. आजवरच्या राज्यपालांनी महाराष्ट्राचा नावलौकीक वाढविण्याचे काम केले आहे. पण यावेळी अशी व्यक्ती या ठिकाणी आणली, ती व्यक्ती महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देण्याचे काम करत आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल टिंगल करणारे उदगार काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे.
फुले यांना संपूर्ण देशात सर्वसामान्यांना संघटीत करण्यासाठी, स्त्री शिक्षणासाठी कष्ट उचलणारे एक महान नेते ओळखले जाते. महात्मा फुले यांचे नाव संपूर्ण देशात सन्माने आणि आदाराने घेतले जाते. ज्यांनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात महत्वाचे काम केले आहे, त्यांची टिंगळटवाळी करण्याचे काम राज्यापालांकडून केली जात असेल तर राज्यपाल म्हणून राहण्याचा त्यांना अधिकार नाही. या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारला संदेश द्यायचा अहे की राज्यपालांची लवकरात लवकर करा; नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असे पवारांनी ठणकावले.
पवार म्हणाले की, संपूर्ण देशाला ऊर्जा देण्याचे काम शिवछत्रपती यांनी केले आहे. शिवछत्रपतीबद्दल अवमानकार भाषा हा महाराष्ट्र सहन करणार नाही. ती चिड व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आलो आहोत. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अपमानाची सध्या मालिका सुरू आहे. राज्यातील एका मंत्र्याने भीक मागून शाळा सुरू केल्याचे विधान केले. त्यांनी आंबडेकर, फुले, कर्मवार भाऊराव पाटील यांची नावे घेतली. या सर्व महापुरुषांनी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले होते. ते नाव बदलून त्या ठिकाणी माझे नाव द्यावे, देगणी देतो, असे एका धनिकाने भाऊराव पाटील यांना सांगितले होते. त्यावेळी त्यांनी एकवेळ बापाचे नाव बदलेन पण शिवछत्रपतींचे नाव बदलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आज कर्मवीरांनी उभारलेल्या शिक्षणसंस्थेत चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कर्मवीर पाटील, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरत असतील त्यांना धडा शिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.