Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Dombivli Politics : भाजपच्या मुंडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; स्थानिकांची पाठ, वादाची ठिणगी ? की...

शर्मिला वाळुंज

Dombivli News : सत्तेत असूनही दिव्यातील विकासकामांवरून मित्र पक्षावर कायमच टीकेची झोड उठवणारे भाजपचे माजी दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. येथील जनतेला न्याय देण्यासाठी तसेच येथे जो भस्मासुर माजला आहे. त्याचा नाश करण्यासाठी मी मशाल चिन्ह हाती घेतली असल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी या वेळी दिली.

मित्र पक्षात असूनही मुंडे हे शिवसेना (Shivsena) शिंदे गटास वारंवार आव्हान देत होते. त्यातच भाजपने नवीन जिल्हा कार्यकारिणी आणत मुंडे यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याने मुंडे यांनी पक्ष सोडल्याची चर्चा आहे. यासोबतच एका वेगळ्या चर्चेलादेखील दिव्यात उधाण आले आहे. मुंडे यांच्या प्रवेशावेळी माजी आमदार तथा कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांची अनुपस्थिती दिसून आली असून, भोईर यांची याविषयी नाराजी आहे का ? याची चर्चा होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाणे (Thane) महानगरपालिकेचा भाग असलेल्या दिवा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरीकरण व नागरीकरणाच्या मानाने येथील विकास मात्र झालेला नाही. अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, पाण्याची टंचाई, रुग्णालय नाही, बकालपणा यांसारख्या समस्यांनी शहराला घेरले आहे. दिव्यातील डम्पिंग ग्राउंड, अनधिकृत बांधकाम, पाणी समस्या यावर मुंडे यांनी वेळोवेळी सत्ताधाऱ्या विरोधात आवाज उठविला आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना व भाजप युतीचे सरकार असूनसुद्धा दिव्याच्या विकासाकडे मात्र या सत्ताधाऱ्यांचे कायमच दुर्लक्ष झालेले आहे.

त्यातच दिव्याला माजी उपमहापौर पददेखील मिळाले. शिवसेनेचे रमाकांत मढवी हे माजी उपमहापौर राहिले आहेत. मात्र, तरीही ते शहराच्या विकासासाठी फारसे काही करू शकलेले नाहीत. शिंदे गटाकडून येथील भाजपचा (BJP) आवाज कायमच दाबला गेला आहे. शिवसेनेत शिंदे व ठाकरे गट अशी फूट पडल्यानंतर भाजपचे दोन्ही आमदार काहीसे आक्रमक झालेले दिसले. आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी दिव्यातील समस्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. दिव्यातील स्थानिक कार्यकर्ते रोहिदास मुंडे हे भाजपचे नेतृत्व करत होते.

दिव्यातील भाजपचे दोन मंडळ अध्यक्ष आदेश भगत आणि नीलेश पाटील हे शिंदे गटात गेल्यानंतर भाजपचे सरचिटणीस राहिलेले मुंडे यांना दिवा मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी मागील वर्षी देण्यात आली होती. यानंतर मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटास वारंवार आव्हान दिले. अनधिकृत बांधकाम आणि पाण्याचा जटील प्रश्न यावर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनादेखील आव्हान देत होते.

आगामी लोकसभा निवडणुका पाहता शिवसेना शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आपापसात जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे यांना फारसा त्रास होऊ नये म्हणून भाजपमधील वरिष्ठांनी जिल्हा कार्यकारिणी ठरविताना शिंदे गटास सहकार्य होईल, अशाच पदाधिकाऱ्यांची वर्णी पदांवर लावली आहे. त्यातच मुंडे यांचे मंडळ अध्यक्षपददेखील काढून घेण्यात आल्याचे समजते.

आपला आवाज दाबला जात असल्याचे कारण देत मुंडे यांनी ठाकरे गटाची मशाल हाती घेतली आहे. दिव्याच्या विकासासाठी आणि येथील भस्मासुराचा वध करण्यासाठी ही मशाल कायम पेटत राहील, असे मुंडे यांनी पक्षात प्रवेश करताना सांगितले. मुंडे यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश झाला असला, तरी ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील दमदार नेतृत्व म्हणजेच कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार सुभाष भोईर यांची उपस्थिती मात्र या प्रवेशादरम्यान दिसून आली नाही. यामुळे भोईर यांना मुंडे यांचा प्रवेश मान्य आहे की नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून सुभाष भोईर, तर भाजपकडून रोहिदास मुंडे यांनी अर्ज भरला होता. मात्र, भाजप सेनेची दिलजमाई झाल्यानंतर भोईर आणि मुंडे यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. शिवसेनेकडून रमेश म्हात्रे यांनी अर्ज भरला होता. त्यांचा पराभव मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला.

शनिवारी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत रोहिदास मुंडे त्यांच्यासह राजश्री मुंडे, कल्पिता मुंडे, विकास इंगळे, नागेश पवार, प्रशांत आंबोणकर, मूर्ती मुंडे, शनिदास पाटील, संजय जाधव, बैद्यनाथ पाडी, अक्षय वनगुळे, सागर पवार, सुधीर घाडीगांवकर, उत्तम सिंग, सचिन विश्वकर्मा यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिवसेना नेते संजय राऊत, अरविंद सावंत, लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT