Kalyan-Dombivli News : कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा असून, इथे शिंदे गटाचाच उमेदवार असेल, असे शिवसेना शिंदे गटाकडून सांगितले जात असले तरी गेल्या वर्षभरापासून या मतदारसंघात भाजपची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ असला तरी भाजपच्या सहकार्याने ही जागा सेनेला जिंकता आली आहे. भाजपला इथे स्वतःचा उमेदवार आणून संघावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करावयाचे असल्याचे भाजपच्या (BJP) गोटातून सांगण्यात येते.
यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार संजय केळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच या लोकसभेच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जर तुमची युती आहे तर सेनेच्या मतदारसंघात भाजपला बैठका घेण्याचे कारण काय, असे म्हणत शिंदे गटाला इशारा दिला आहे, तर मनसेचे आमदार राजू पाटील यांनीदेखील येथील वाटचाल भाजप उमेदवाराच्या दिशेने सुरू आहे, असे म्हणत रोहित पवार यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. या दोन्ही आमदारांच्या वक्तव्याने कल्याण लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचा उमेदवार असणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा सध्या शिवसेनेकडे (Shivsena) असला तरी पूर्वी भाजपच्या ताब्यात होता. या मतदारसंघात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने वर्षभरापूर्वीच तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन ते चार वेळा मतदारसंघाचा दौरा करून गेले आहेत. तसेच मंत्री रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात असले तरी चव्हाण यांचे मुख्यमंत्री शिंदे यांचे श्रीकांत शिंदे यांच्याशी मतभेद आहेत. मतदारसंघातील भाजपचे इतर आमदार, पदाधिकारीदेखील श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा श्रीकांत शिंदेंना मदत करण्याऐवजी मंत्री चव्हाणांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले आहे. तशा स्वरूपाच्या अनेक हालचाली लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहेत. त्यातच रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाला एक सल्ला देऊ केला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघांमध्ये जर युती असेल तर समझोता असेल, तिथे भाजपला बैठका घेण्याचे कारण काय ? तिथे चाचपणी करण्याचे कारण काय ? सर्व्हे करायचे कारण काय ?
याच्यावरून समजून जायचे की, भाजपला त्यांचेच चिन्ह आणि त्यांचा पक्ष समजतो. बाकी कुठले नेते आणि लोकांचे प्रश्न कळत नाही. अनुराग ठाकूर यांना या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे, कारण इथे मुख्यमंत्री साहेबांचा मुलगा खासदार आहे, त्यामुळे मोठ्या नेत्यांना इथली जबाबदारी दिली आहे, असेही कुठे दबक्या आवाजात कळत आहे. चव्हाण यांना कदाचित इथून भाजपची उमेदवारी दिली जाऊ शकते, असे पवार यांनी सांगितले.
राजू पाटील यांनी म्हणाले, तसे पाहिले तर कल्याण लोकसभा ही पूर्वीपासून भाजपचीच होती. ज्यावेळी भाजपच इथे काही चालत नव्हते, त्यावेळी स्वर्गीय दिघे साहेबांनी आपल्या हातात खेचून घेतली. आता कुठेतरी भाजप वरचढ होताना दिसून येत आहे. मला नाही वाटत की ही संधी सोडतील, कारण भाजपची एक पद्धत राहिली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) बोलले ते बरोबर बोलले.
भाजप नेहमी समोरच्या पक्षाला दाबायला बघतो, त्यांचे म्हणणे रास्त आहे. त्या अनुषंगाने तुम्ही इथल्या वाटाघाटी बघाल तर कल्याण लोकसभेची वाटचाल भाजपच्या उमेदवाराच्या दिशेनेच चालू आहे, एकंदरीत असे दिसत आहे, असे पाटील यांनी सांगत रोहित पवार यांच्या सुरात सूर मिसळला. दरम्यान, यावर शिवसेना शिंदे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे कल्याण लोकसभा निवडणूक भाजप लढवते की, शिवसेना शिंदे गट हे पाहावे लागेल.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.