Sachin Ahir Government Bungalow Row  Sarkarnama
मुंबई

Sachin Ahir: दोन सरकारी बंगले हुकले! अखेर पदरी आला फ्लॅट; सचिन अहिर शिंदेंकडे मागणार दाद?

Maharashtra Politics Government Bungalow Row: महायुतीत सरकारी बंगल्यांच्या वाटपावरून नवा वाद. दोन बंगले हातातून गेल्यानंतर उपसभापती सचिन अहिर यांना चर्चगेट येथे फ्लॅट देण्यात आला. एकनाथ शिंदेंकडे दाद मागण्याची शक्यता.

Mangesh Mahale

Maharashtra Government Bungalow: महायुतीत सध्या सरकारी बंगल्यावरुन मोठी रस्सीखेच सुरु झाली आहे. उपसभापती सचिन अहिर यांना मंजूर झालेल्या रायगड बंगला रद्द करुन त्यांना चर्चगेट येथील प्लॅट देण्यात आला आहे. तर नीलम गोहे यांचा पुरंदर बंगला राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांनी पटकवला आहे.

हक्काचा बंगला हुकल्यामुळे सचिन अहिर नाराज झाले आहेत. ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्याकडे दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिली आहे.

राज्यातील महायुती सरकारमध्ये सत्तेच्या समीकरणांसोबतच शासकीय निवासस्थानांच्या वाटपावरूनही हालचाली वेगाने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांच्या शासकीय निवासस्थानाच्या वाटपात सलग दोनदा बदल झाल्याने अखेर त्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आला आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील नेत्यांमध्ये शासकीय बंगल्यांसाठी स्पर्धा असल्याची चर्चा रंगली आहे.

उपसभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सचिन अहिर यांना मंत्रालयासमोरील 'रायगड' (A-6) हा शासकीय बंगला देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, हा बंगला सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात असल्याने वाटपाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, हा निर्णय रद्द करण्यात आला.

यानंतर अहिर यांच्यासाठी 'पुरंदर' (C-3) हा बंगला विचाराधीन होता. हा बंगला सध्या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. दरम्यान, विधानसभेचे नवनियुक्त उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही याच बंगल्यासाठी दावा केला. अखेरीस 'पुरंदर' बंगला अण्णा बनसोडे यांना देण्याचा निर्णय झाल्याने सचिन अहिर यांना दुसऱ्यांदा निराशा पत्करावी लागली.

सलग दोन बंगल्यांचे वाटप न झाल्यानंतर प्रशासनाने अखेर चर्चगेट येथील 'सुनीती' इमारतीतील एक शासकीय सदनिका सचिन अहिर यांच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, बंगला मिळण्याची अपेक्षा असताना फ्लॅटचे वाटप झाल्याने त्यांनी अद्याप त्या निवासस्थानी प्रवेश केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे महायुती सरकारमधील शासकीय बंगल्यांच्या वाटपावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT