CM Uddhav Thackeray, Sambhajiraje chhatrapati Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकावली? पहाटेच सोडली मुंबई

संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत म्हणून उमेदवारी स्वीकारण्याची ऑफर देण्यात आली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून होकार द्यावा, यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी फिसकटल्या असल्याचे समजते. संभाजीराजेंना ही ऑफर स्वीकारण्यासाठी सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आली आहे. पण ते पहाटेच मुंबई सोडून कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाल्याचे समजते. (Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News)

संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्याचा शिवसेनेचा (Shiv Sena) प्रस्ताव नाकारला असल्याची माहिती आहे. त्याबाबत आज दुपारीच चित्र स्पष्ट होईल. संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उभे राहण्याचे जाहीर केले आहे. पण अद्याप कोणत्याच पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

महाविकास आघाडीत शिवसेनेला दोन जागा मिळत आहेत. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांनी शिवबंधन हाती बांधावे, अशी अट घालण्यात आली आहे. पण संभाजीराजे हे सुरूवातीपासूनच अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यानंतरही शिवसेनेेचे नेते रविवारी दिवसभर संभाजीराजेंच्या संपर्कात होते. त्यांना सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. पण त्यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावून सोमवारी पहाटेच मुंबई सोडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, रविवारी मुंबईत दिवसभर संभाजीराजे आणि शिवसेना हाच विषय राजकीय वर्तुळात चर्चेला होता. संभाजीराजे यांच्याकडे मंत्री उदय सामंत, खासदार अनिल देसाई आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. तेथेच संभाजीराजेंना शिवसेनेत येण्याचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले. मात्र संभाजीराजेंनी लगेच होकार दिला नव्हता. त्यांचा नकार गृहित धरूनच शिवसेनेचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) य़ांनीही आपला प्लान बी तयार केला असून सहाव्या जागेसाठी आता शिवसेनेच्या ग्रामीण भागातील नेत्याला राज्यसभेची उमेदवारी देण्याचे त्यांनी जवळपास निश्चित केले आहे. त्यातही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याही समर्थकांसाठी चांगली बातमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ठाकरे यांचे उजवे हात मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांचेही नाव चर्चेत आहे.

सध्या दिल्लीत संजय राऊत हे एकहाती शिवसेनेचा किल्ला सांभाळत आहेत. त्यात आता नार्वेकर यांची भर घालून शिवसेनेचे राजधानीतील नेटवर्क अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न नार्वेकर यांच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे ठाकरे यांच्या मनात ते देखील नाव घोळत असावे. परप्रांतीय आणि पक्षाशी संबंध नसणाऱ्यांना राज्यसभेची खासदारकी देण्याची शिवसेनेची आतापर्यंत परंपरा आहे. मात्र या वेळी तसे होण्याची शक्यता फेटाळण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT