Sanjay Raut, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "दाढी तुमची लंका जाळून टाकेल", CM शिंदेंच्या विधानावर राऊत प्रत्युत्तर देत म्हणाले...

Akshay Sabale

माझ्यावर उठसूठ आरोप केले जात आहेत. ही दाढी हलकी समजू नका. दाढीची काडी फिरवली तर तुमची लंका जाळून टाकेल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ( 11 फेब्रुवारी ) दिला होता. याला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "तुम्ही ज्या लंकेत गेला आहात, तीच आम्ही लोकसभेला जाळणार आहोत. त्यामुळे दाढीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका," अशा शब्दांत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, "लंका मुख्यमंत्र्यांची आहे. आम्ही हनुमान आहोत. लंका ही रावणाची जळत असते, हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही. श्री रामाला दाढी नव्हती. दाढी रावणाला होती. मुख्यमंत्र्यांना रामायण आणि महाभारत वाचावं लागेल. त्यामुळे कुणाचं काय जळतंय हे लवकरच कळेल."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"दाढी वगैरेच्या गोष्टी आम्हाला सांगू नका"

"तुम्ही ज्या लंकेत गेला आहात, ती दिल्लीची लंका लोकसभा निवडणुकीत आम्ही जाळत आहोत. तेव्हा तुमचं काय होणार? ही दाढी वगैरेच्या गोष्टी आम्हाला सांगू नका," असं राऊतांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं आहे.

"चोरट्यांचं राज्य महाराष्ट्रात सुरू आहे"

'बाळासाहेब चोरायला काय एखादी वस्तू आहेत का?' असं वक्तव्यही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं होतं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, "विचार चोरून मिळत नाहीत. चोरट्यांचं राज्य महाराष्ट्रात सुरू आहे. असे डायलॉग आम्हाला सांगू नका. आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालो आहोत. आम्हालाही डायलॉग मारता येतात."

"मुख्यमंत्र्यांच्या दाढीलाच आग लावणार"

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे सुधांशू त्रिवेदी यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित केली आहे. याबाबत विचारल्यावर संजय राऊतांनी म्हटलं, "याबद्दल दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांचं मत विचारा. आता कुणाची लंका तुम्ही जाळणार आहात? की तुमच्याच शेपटीला आग लावून घेत आहात. लंकेला नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या दाढीलाच आग लावणार आहोत."

"मुख्यमंत्री घाबरलेत, त्यांना झोप येत नाही"

"आज मुद्दाम मुख्यमंत्री आणि गुंडांबरोबरचा फोटो टाकला नाही. त्यांना थोडी विश्रांती दिली आहे. मुख्यमंत्री घाबरलेत, त्यांना झोप येत नाही. कारण, लवकरच असे काही फोटो येणार असून, गृहमंत्री अमित शाहांनासुद्धा विचार करावा लागेल की मी कुणाला नेमलं आहे?" असा सूचक इशाराही राऊतांनी दिला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT