Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : पुन्हा लढण्याचा निर्धार केलेले संजय राऊत सावलीप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शंभर दिवस कारागृहात राहिल्यानंतर खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला होता

अय्यूब कादरी

Maharashtra Political news : कथित पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपवरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. शंभर दिवस कारागृहात राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता.

भाजपशी केलेली युती तोडून महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे, केंद्रातील भाजप सरकार आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करण्याची शिक्षाच जणू राऊत यांना मिळाला होती, अशी चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात झाली.

जामीन मिळाल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. आता पुन्हा मी लढणार, असा निर्धार राऊत यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. त्याप्रमाणे ते लढत आहेत. सर्वच शिलेदार सोडून गेल्यामुळे एकाकी पडलेल्या उद्धव ठाकरे यांच्यामागे ते सावलीप्रमाणे उभे आहेत. (Latest Political News)

प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घ्यायचे, असा शब्द अमित शाह यांनी दिला होता, असा उद्धव ठाकरेंचा दावा होता. भाजपने तो साफ फेटाळून लावला होता. त्यावरून शिवसेनेने भाजपशी असलेली युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला होता. हे तात्कालिक कारण असले तरी २०१९ च्या निवडणूक प्रचारापासूनच शिवसेनेत खदखद होती. भाजपने अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा शिवसेनेचा आरोप होता.

भाजपसोबत राहिलो तर शिवसेना संपून जाईल, असे नेतृत्वाला वाटत होते. त्यामुळे महाविकास आघाडी आकाराला आली. शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करून बाळासाहेंबाच्या विचारांशी द्रोह केला, असे म्हणत बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांचीही त्यावेळी महाविकास आघाडीला मान्यता होती, असे म्हणावे लागेल.

मान्यता नसती तर त्यांनी तसे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर बोलून दाखवले असते. ठाकरे यांनी ते मान्य केले नाही, असे गृहीत धऱले तरी शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेले मंत्री महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद नाकारू शकले असते. तसे काहीही झाले नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह केला, याची उपरती शिंदे आणि अन्य आमदारांना अडीच वर्षांनतर झाली होती.

आता येथेच संजय राऊत (Sanjay Raut) यांची निष्ठा, त्यांच्या निर्धाराची ओळख झाली. शिंदे आणि ४० आमदार शिवसेनेतून बाहेर का पडले, याची कुजबूज आजही सुरू असते. शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या अनेकांच्या मागे ईडीने चौकशीचा ससेमिरा लावला होता. ते सर्वजण शिंदे यांच्यासोबत भाजपकडे गेल्यानंतर ईडीने तो ससेमिरा बंद केला आहे, हे आता सर्वांनाच समजले आहे. वाटले असते तर राऊतही शिंदेंचा मार्ग धरू शकले असते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. दररोज सकाळी ते टीव्हीवर आले की भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना धडकी भरत असे. अनेक प्रयत्न करूनही राऊत बधत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मागे ईडी लावण्यात आली.

शंभर दिवस कारागृहात राहून आल्यानंतर ते काही दिवस शांत राहिले. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने सुटकेचा निःश्वास घेतला. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. भाजप, शिंदे गटाच्या जिव्हारी लागेल, अशी टीका राऊत यांनी पुन्हा सुरू केली. नेत्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले असतील त्यांची ईडीमार्फत चौकशी करण्याला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, फक्त आपल्या विरोधात बोलणाऱ्या, विरोधी पक्षांतीलच नेत्यांवर अशी कारवाई केली जात आहे. सत्ताधारी पक्षातील किंवा सत्ताधारी पक्षात सामील झालेले सर्व नेते निष्कलंक आहेत, असा अजब पायंडा या सरकारने पाडला आहे, हे एव्हाना लोकांच्याही लक्षात आले आहे.

राऊत यांना गेल्या वर्षी नऊ नोव्हेंबरला जामीन मिळाला होता. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. एकनाथ शिंदे आणि ४० आमदार सोडून गेल्यामुळे उद्धव ठाकरे एकाकी पडले होते. अशातच या ४० जणांसह भाजपकडूनही ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका, विविध आरोप केले जात आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सातत्याने लांबणीवर पडत आहेत. अशा काळात संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून टीका, आरोप परतवून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT