Sanjay Raut Devendra Fadanvis Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : ललित पाटील मोहरा, हिंमत असेल तर दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत; राऊतांचं फडणवीसांना आव्हान

Sachin Fulpagare

Lalit Patil Drug Case : 'सोलापूर, नाशिक, मुंबई आणि पुणे आतापर्यंत ७०० ते ८०० कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावं. ललित पाटील हा एक मोहरा आहे. या ललित पाटील प्रकरणाचा गैरवापर राज्याचे गृहमंत्री राजकारणासाठी करताहेत. हे अत्यंत दुर्दैवं आहे', असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

'नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचा ड्रग्ज विरोधात मोर्चा आहे. संपूर्ण नाशिक सध्या ड्रग्जच्या विळख्यात आहे. नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे आणि हे एक सांस्कृतिक शहर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते कुसुमाग्रजांपर्यंत महान लोक जन्माला आले. हे संपूर्ण नाशिक त्र्यंबकेश्वरपर्यंत ड्रग्जच्या विळख्यात आहे.

ड्रग्जचे दोन मोठे कारखाने नाशिकमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज नाशिकमधून महाराष्ट्राबाहेर गेलं. महाराष्ट्रात येणारं ड्रग्ज हे गुजरातमधून येतं. हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे का?', असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आपर्यंत दीड लाख कोटींचं ड्रग्ज हे गुजरातमध्ये पकडलं गेलं. आणि जे पकडलं गेलं नाही ते ड्रग्ज महाराष्ट्रात पाठवलं जात आहे. आणि महाराष्ट्राचा उडता पंजाब करून महाराष्ट्र नशेच्या आहारी टाकला जात आहे.

महाराष्ट्र बदनाम करायचा, महाराष्ट्राची तरुण पिढी उद्ध्वस्त कराची. हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल, तर त्यांनी खुशाल या विषयाचं राजकारण करत बसावं. आणि महाराष्ट्राला खड्ड्यात जाताना पाहावं', असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

'तुम्ही गृहमंत्री आहात ना. गृहमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला जपा आणि वागा, अशी त्यांना विनंती आहे. उद्याचा नाशिकचा मोर्चा हा इशारा मोर्चा आहे. कॉलेजचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि नाशिकचे नागरिक उद्या मोर्चात सहभागी होतील. कारण नाशिकपासून ते त्र्यंबकेश्वरपर्यंतचा संपूर्ण परिसर ड्रग्जच्या विळख्यात सापडला आहे', असं राऊत म्हणाले.

'ललित पाटीलचं नाशिक कनेक्शन आहे. नाना पटोलेंनी या संदर्भात दोन कॅबिनेट मंत्र्यांवर आरोप केले आहेत. हे दोन मंत्री या सगळ्या प्रकरणात आहेत. फडणवीसांनी त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर बोलावं. चौकशी आयोग नेमावा आणि हिंमत असेल तर दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत', असं आव्हान राऊत यांनी फडणवीस यांना दिलं आहे.

'आम्हाला धमक्या देऊ नका. फार तर काय कराल, तुम्ही आमच्यावर खोटी प्रकरणं आणि खोटे गुन्हे दाखल कराल. २०२४ मध्ये काय होणार ते लक्षात ठेवा. २०२४ ला तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. आतापर्यंत आम्ही कधी सूडाने वागलो नाही. राजकारण हे सूडाचा कारखाना नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही वागताय, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत.

तुम्हाली मित्र परिवार आणि तुमचेही व्यवहार तसेच व्यापार आहेत. तुमच्याही चोऱ्या माऱ्या उघड झालेल्या आहेत. आज सत्ता आहे म्हणून तुम्ही दाबताय. या ड्रग्ज प्रकरणाच्या मुळाशी जाऊन गृहमंत्र्यांनी सत्य शोधून काढलं पाहिजे', अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

'पोलिसांच्या ताब्यात असलेला ड्रगमाफिया सांगतोय मला पळवलं. येरवडामधून त्याला बाहेर काढलं. नऊ महिने त्याची ससूनमध्ये खातीरदारी केली. पाहुणा म्हणून राहिला, मग मंत्र्यांच्या आदेशाने त्याची पूर्ण व्यवस्था झाली. हे स्वतः तो मफिया सांगतो. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं डोकं ठिकाणावर आहे का? का त्यांनाही नैराश्याने ग्रासलं आहे?', असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT