Harshvardhan Sapkal, Sanjay Raut, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Rajya Sabha Election: संजय राऊतांची ठाकरेंचा हट्ट मोडून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी एवढी धडपड का ? 2028 चा मोठा प्लॅन डोक्यात..?

Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या गोटातून खासदार संजय राऊतांनी शरद पवारांच्या राज्यसभेच्या खासदारकीसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचं दिसून आलं होतं. त्यांची धडपड लक्षात येताच आदित्य ठाकरेंनी शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत छाप पाडल्याचं सांगत पुन्हा एकदा त्यांना खासदारकीची संधी मिळावी अशी मागणी करत आपला पत्ता ओपन केला.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त झालेल्या सात जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता सध्यस्थितीत महायुतीला सहा तर महाविकास आघाडीच्या पदरात अवघी एक जागा पडण्याची शक्यता आहे. या एका जागेसाठी महाविकास आघाडीत तीव्र संघर्ष सुरू असल्याचं समोर येत आहे.

यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी मात्र कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट महाविकास आघाडीकडून सर्वात प्रथम शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावं अशी इच्छा व्यक्त करत राजकीय बॉम्ब टाकला. राऊतांनी पवारांसाठी सुरू केलेल्या या धडपडीपाठीमागं त्यांच्या डोक्यात 2028 ला होणाऱ्या राज्यसभेचा प्लॅन तर शिजत नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीच्या गोटातून खासदार संजय राऊतांनी शरद पवारांच्या राज्यसभेच्या खासदारकीसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचं दिसून आलं होतं. त्यांची धडपड लक्षात येताच आदित्य ठाकरेंनी शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत छाप पाडल्याचं सांगत पुन्हा एकदा त्यांना खासदारकीची संधी मिळावी अशी मागणी करत आपला पत्ता ओपन केला. राज्यसभेवर जाण्यास उत्सुक नसलेल्या पवारांचं मन वळवण्यात यशस्वी झाल्याचं सांगत संजय राऊतांनी आपला पत्ता टाकला होता.

पण संजय राऊत आदित्य ठाकरेंचा हट्ट मोडून शरद पवारांच्या राज्यसभेच्या खासदारकीसाठी महाविकास आघाडीत खिंड लढवण्यापाठीमागं दोन वर्षानं अर्थात 2028 ला होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत आपली स्वत:ची खासदारकी सेफ करण्याचा त्यांचा डाव असल्याचं बोललं जात आहे.

राज्यसभेची एक जागा निवडून येण्यासाठी 37 आमदारांचं मतदान लागणार आहे. त्यानुसार महायुतीतील भाजपला चार जागा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एक तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे. त्यातच आता महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असलेल्या एका जागेवरून काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

संजय राऊत हे आता राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ इच्छित आहे.तसेच विधान परिषदेची एक जागा ते काँग्रेसला देण्यास तयार असल्याचे समोर येत आहे. या दोन्ही जागांच्या बदल्यात राऊत 2028 च्या राज्यसभेच्या निवडणुकीत स्वत: ची खासदारकी सुरक्षित व पक्की करण्याच्या विचारात असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांसाठी लवकरच होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून एक जण सहज विजयी होवू शकतो असं म्हटलं होतं. तसेच या जागेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा होती. तसे संकेतही राऊतांनी दिले होते.

पण संजय राऊतांच्या या वक्तव्याला आमदार आदित्य ठाकरे यांनीच खो देत शिवसेना मोठा पक्ष आहे. त्यामुळे पहिला क्लेम हा शिवसेनेचा असेल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राऊतांना यू टर्न घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. पण त्यांचा एकंदरीत स्वभाव पाहता ते राजकीय जुगाड लावून पुन्हा एकदा शरद पवारांना राज्यसभेवर पाठवू शकतात.

सध्यातरी आदित्य ठाकरेंच्या नव्या डाव्यानं संजय राऊतांना 'खासदारकी' सुरक्षित करण्याचा त्यांचा प्लॅन तूर्तास तरी 'वेटिंग'वरच ठेवावा लागू शकतो. कारण ते आजमितीला तरी आदित्य ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेण्याची हिंमत दाखवू शकत नाही. याच धर्तीवर त्यांनी माझी आणि आदित्य ठाकरे यांची भूमिका वेगळी नाही. आमचा पक्ष हा 20 आमदारांचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे जो निवडून जाणार आहे तो खासदार मविआचाच जाईल. असं सांगत शरद पवारांच्या राज्यसभेच्या पुन्हा खासदारकीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन यू टर्न घेतल्याचंच दिसून येत आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी पुण्यात राज्यसभेच्या जागेबाबत भूमिका मांडली होती. त्यावेळी त्यांनी मागील वेळी विधान परिषदेवर मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांना संधी देण्यात आली होती. आता देखील आमची तीच इच्छा आहे की, उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावे. तसेच राज्यसभेची जागा ही काँग्रेससाठी सोडण्यात यावी. काँग्रेस उमेदवाराला खासदार म्हणून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळावी असं म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT