sanjaykaka patil | ajit pawar | rohit patil sarkarnama
मुंबई

Tasgaon Assembly Constituency : रोहित पाटलांविरोधात अजितदादा संजयकाकांच्या कुटुंबात उमेदवारी देणार का?

Akshay Sabale

Tasgaon News: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( शरदचंद्र पवार ) रोहित पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्याविरूद्ध भाजप की अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी उमेदवार देणार? याची चर्चा सुरू आहे. यातच सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आहे.

संजयकाका पाटील अथवा त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून लढणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, हा मतदारसंघ जागावाटपात भाजप की राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार? हे अद्याप ठरलं नाही. पारंपारिक रित्या हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे महायुतीत असलेल्या राष्ट्रवादीकडून येथे दावा सांगण्यात येईल. त्यामुळे जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यास संजयकाका पाटील अथवा त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांना ‘घड्याळ’ हाती बांधावं लागणार आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजयकाका पाटील म्हणाले, “तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाबाबत अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. आताही जागावाटप अंतिम व्हायचं आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिल्यास काय निर्णय घ्यायचा? उद्देशानेच अजितदादांशी भेटीत चर्चा झाली.”

तासगावमधून तुम्ही की सुपुत्र निवडणूक लढविणार? असा प्रश्न विचारल्यावर संजयकाका पाटील यांनी म्हटलं, “हे अजून ठरायचं आहे. याबद्दल कार्यकर्त्यांशी बोलून शनिवारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. मात्र, तालुक्यातील गणिते आणि समीकरणं पाहून पुढचे पाऊल उचलणार आहे. आता फक्त हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच आहे का? याबाबत चर्चा केली. जागेबद्दल पुढील निर्णय अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस घेतील.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी रोहित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तासगाव-कवठेमहांकाळ हा मतदारसंघ राष्ट्रवादीला बालेकिल्ला आहे. त्यामुळे अजितदादा तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजयकाका पाटील यांनी अजितदादांची भेट घेतली आहे. जर, जागावाटपात हा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वाट्याला आला, तर रोहित पाटलांविरोधात अजितदादा संजयकाका पाटील अथवा त्यांच्या सुपुत्राला उमेदवारी देतात का? हे पाहावं लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT