satej patil dada bhuse
satej patil dada bhuse sarkarnama
मुंबई

Video Satej Patil Vs Dada Bhuse : दादा भुसेंनी एक वक्तव्य केलं अन् सतेज पाटील तुटून पडले; नेमकं काय घडलं?

Akshay Sabale

राज्यातील 12 जिल्ह्यांतून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गावरून विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार, सतेज पाटील आणि मंत्री दादा भुसे आमने-सामने आले आहेत. शक्तीपीठ महामार्गाला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून मोठा विरोध झाला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी होत आहे.

पण, कोल्हापुरातून काही निवेदन प्राप्त झाली असून, महामार्गात काही बदल सुचवले आहेत, असं वक्तव्य दादा भुसेंनी ( Dada Bhuse ) केलं. यानंतर सतेज पाटील दादा भुसेंवर संतापले आणि निवेदन दाखविण्याची मागणी केली. यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच गरम झालं. यात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी केली.

नेमकं काय घडलं?

दादा भुसे म्हणाले, "हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धारशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग आणि गोव्यातील सीमेपर्यंत जोडला जाणार आहे. यात माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, ओंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महामार्ग आहे. हा महामार्ग प्राथमिक स्तरावर आहे. कोल्हापुरातील काही निवेदनं प्राप्त आहेत. त्यानुसार महामार्गात काही बदल सुचवले पाहिजे, अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत."

"निवेदन दाखवावीत"

यानंतर सतेज पाटील ( Satej Patil ) चांगलेच भडकले. "तुम्हाला तशी निवेदन प्राप्त झाली असतील, तर आम्हाला दाखवावीत. तुम्ही ऑन रेकॉर्ड बोलत आहात. पण, ती निवेदन दाखवावीत. आम्हालाही कळुद्या," असं आव्हान सतेज पाटलांनी दिलं.

"दाखवायला काहीच अडचण नाही"

यावर दादा भुसे म्हणाले, "तुमची इच्छा असेल, तर मला दाखवायला काहीच अडचण नाही. कोल्हापुरात काही आंदोलन झाली आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं, 'नागपूर-गोवा महामार्गाविरोधात आंदोलन सुरू आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे. त्यांच्या भावनांचा विचार करून आणि विश्वासात घेऊन प्रकल्प केला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपवणार नाही किंवा रेटून नेणार नाही. समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प जनतेला विश्वासात घेऊन केला आहे. शक्तीपीठ महामार्गाला जिथे विरोध आहे, तिथे फेरआखणी करण्याबाबत विचार केला जाईल. मात्र, जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं."

"मंत्र्यांनी काय निवेदने आली आहेत?"

त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. सतेज पाटील म्हणतात कुठलंच निवेदन आलं नाही. सरकार म्हणत आहे, निवेदन आले आहेत. पण, अधिवेशन चालू आहे. मंत्र्यांनी काय निवेदने आली आहेत? कशापद्धतीनं विचार करत आहात? त्याबद्दल पुढील आठवड्यात बैठक घ्या. तरी समाधान नाही झालं, तर वेगळ्या मार्गानं प्रश्न उपस्थित करा. लोकभावनांवर चर्चा करा आणि संवाद करण्याची सरकारची तयारी आहे."

"मोनार्क कंपनी तुमची जावाई आहे का?"

यानंतर सतेज पाटील म्हणाले, "सरकारनं परवानगीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. तुम्ही इथे नाही म्हणून उत्तर देत आहात. दुटप्पीपणा चालू आहे. मग, केंद्राला कशासाठी प्रस्ताव पाठवला आहे. केंद्राकडे पाठवलेला प्रस्ताव मागे घेणार आहात का? मोनार्क नावाच्या कंपनीनं 9 महिन्यांमध्ये हा प्रस्ताव तयार केला. मोनार्क कंपनी तुमची जावई आहे का? समृद्धी महामार्गात याच कंपनीनं महाराष्ट्राचं वाटोळं केलं. कंत्राटदार धार्जिणी रस्ता करण्याचं धोरण आखलं जात आहे. महामार्ग रद्द करणार हे मंत्री सांगत नाहीत. लोकसभेला 11 ठिकाणी फटका बसला आहे. हा रस्ता करून अजून फटका बसवून घ्या."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT