Aaditya Thackeray defamation notice Sarkarnama
मुंबई

Disha Salian Case: आदित्य ठाकरे, अनिल देशमुख अडचणीत? दिशा सालियन प्रकरणी 500 कोटींची मानहानीची नोटीस

Aaditya Thackeray defamation notice: सतीश सालियन यांनी मुलीला न्याय मिळावा, यासाठी न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला आहे. मात्र, आपल्या या प्रयत्नांना राजकीय हेतू असल्याचे चित्र निर्माण करणारी वक्तव्ये करण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी नोटीसमध्ये घेतला आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: दिवंगत दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. दिशा यांचे वडील सतीश सालियन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये सार्वजनिक माफी, संबंधित वक्तव्ये मागे घेणे आणि नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.

सतीश सालियन यांनी मुलीला न्याय मिळावा, यासाठी न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला आहे. मात्र, आपल्या या प्रयत्नांना राजकीय हेतू असल्याचे चित्र निर्माण करणारी वक्तव्ये करण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी नोटीसमध्ये घेतला आहे. अशा वक्तव्यांमुळे आपली तसेच कुटुंबाची प्रतिमा मलीन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नोटीसमधून आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी केलेली वक्तव्ये मागे घ्यावीत आणि त्याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि सोशल मीडिया माध्यमांवर ही माफी प्रसिद्ध करण्याची मागणी असून, त्यासाठी दोघांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास ५०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांच्याशी आपली कधीही भेट किंवा ओळख झाली नसल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून कोणताही पुरावा किंवा संबंध नसतानाही राजकीय हेतूने आपले नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी या आरोपांना नकार देत आपली भूमिका सार्वजनिक केली आहे.

सतीश सालियन यांच्या नोटीसमध्ये आपल्याविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे, निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे. कोणताही विश्वासार्ह आधार नसताना अशा प्रकारची वक्तव्ये करण्यात आल्याने आपल्या सचोटी, विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणावर गंभीर परिणाम झाल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

या कायदेशीर नोटीसमुळे दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. दरम्यान, या प्रकरणात सीबीआयने एफआयआर नोंदविल्यानंतर तपासाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे एकीकडे न्यायालयीन आणि तपासाची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे मानहानीच्या नोटीसमुळे या प्रकरणाला आणखी एक कायदेशीर व राजकीय आयाम मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT