Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : 'तुतारी' अन् 'पिपाणी'तला घोळ मिटणार? शरद पवार गटाचं मोठं पाऊल

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणूक 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हावर निवडणूक लढवली. 'रामकृष्ण हरी-वाजवा तुतारी' ही घोषणा राज्यभर गाजली.

असे असले तरी काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या 'पिपाणी' या चिन्हाने शरद पवारांच्या शिलेदारांचा बोऱ्या उडवला. लोकसभेत 'पिपाणी'मुळे झालेले नुकसान विधानसभा निवडणुकीत नको, त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे Narendra Modi हात बळकट करण्यासाठी भाजपने राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले. त्यानंतर पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या हाती काही लागले नाही.

निवडणुकीत त्यांनी अनुक्रमे 'मशाल' आणि 'तुतारी वाजवणार माणूस' या चिन्हांवर लढाई करावी लागली. त्यानतर ऐन निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची एकसारखी नावे आणि सारखीच दिसणाऱ्या चिन्हातून ठाकरे गट आणि शरद पवार गटाला सत्ताधाऱ्यांनी गाठण्याचे प्रयत्न केल्याचाही आरोप केला जात आहे. याचा फटकाही त्यांना बसल्याचे आता स्पष्ट झाले.

लोकसभेत 'तुतारी वाजवणार माणूस' आणि अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या 'पिपाणी' या चिन्हांत अनेक मतदारांची गफलत झाल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. आता हा फटका टाळण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षाकडून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना 'पिपाणी' चिन्ह देऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. यावर विचार झाला नाही, तर न्यायालयात जाणार असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

सातारा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 'पिपाणी' चिन्हामुळे फटका बसल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. साताऱ्यात शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांचा 32 हजार 771 मतांनी पराभव झाला. तेथील तिसऱ्या क्रमांच्या पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली आहेत.

दिंडोरीत भास्कर भगरे यांनी भाजपच्या डॉ. भारती पवार यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी पराभव केला. तर पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार बाबू भगरेंनी तब्बल 1 लाख 3 हजार 632 मते घेतली आहेत.

यासह शरद पवार गटाने लढवलेल्या बारामती, शिरूर, माढा, भिवंडी, रावेर, वर्धा आदी ठिकाणी अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT