Raj Thackeray, Sharad Pawar, ajit pawar sarkarnama
मुंबई

अजितदादांवरील आरोप पोरकट ; शरद पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं

अजित पवार आणि मी वेगळे नाहीत. आमचे कुटुंब एकच आहेत,''

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या उत्तरसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पवार कुटुंबियांवर टीका केली. ''अजित पवार यांच्या कुटुंबियांची ईडीने चैाकशी केली, पण खासदार सुप्रिया सुळे यांची ईडीनं चैाकशी केली नाही,'' असे विधान राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, ''अजित पवार यांच्यावर ईडीची कारवाई होते आणि सुप्रिया सुळे यांच्यावर होत नाही. हा आरोप पोरकट आहे. अजित पवार आणि मी वेगळे नाहीत. आमचे कुटुंब एकच आहेत,''

''एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यात एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण पत्रकार विचारत आहेत, म्हणून त्यावर मत व्यक्त करतोय,'' असे शरद पवार म्हणाले. ''छत्रपती शिवाजी महाराजांचे मी नाव घेत नाही, असा उल्लेख त्यांनी केला. पण दोनच दिवसापुर्वी मी अमरावतीत होतो. त्याठिकाणचे माझे संपुर्ण भाषण ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर जवळपास २५ मिनिटे बोललो. अर्थात मला रोज सकाळी लवकर उठून वृत्तपत्र वाचनाची सवय आहे. त्यासाठी मला लवकर उठावं लागतं. अनेकदा वृत्तपत्रात काय काय लिहिलंय हे न वाचता एखादा वक्तव्य करत असेल तर त्याला दोष देणार नाही,'' असा टोला त्यांनी लगावला.

''फुले-शाहू-आंबेडकरांबाबतही उल्लेख केला जातो त्याचा अभिमान आहे, मला असे सांगतानाच दुसरी गोष्ट त्यांना माहिती असली पाहिजे की, या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचले होते.या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे,'' असेही शरद पवार म्हणाले.

''मनसे हा संपलेला पक्ष असल्याची टीका होते, हे खरं आहे. मतदारांनी त्यांना जागा दाखवली आहे. मतदारांनीच मनसेला संपवलं आहे. त्यांच्या सभा मोठ्या होतात, त्यांची शिवराय भाषा ,नकला यामुळे करमणूक होते. ठाकरेंच्या भाषणात महागाई आणि सर्व सामान्य यांचा उल्लेख किंचीतही नाही. भाषणात सर्वसामान्यांचा उल्लेख नव्हता. महागाईबाबत ते गप्प का? असा सवाल पवारांनी ठाकरेंना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT