Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Live: शरद पवारांचा राजीनामा अखेर मागे; कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून घेतला निर्णय

NCP Activist : मुंबईतील वाय.बी. सेंटरवर अनेक कार्यकर्त्यांनी मांडला होता ठिय्या

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Resignation Withdraw : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाला राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता.

तसेच मुंबईतील वाय.बी. सेंटरवर मंगळवारपासून अनेक कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. ६ मे पासून आमरण उपोषणाचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी यापुढे तुम्हाला असे बसावे लागणार नाही. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल, असे वक्तव्य करून कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) निवड समितीच्या बैठकीत शुक्रवारी (ता. ५) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमताने नामंजूर करण्यात येत असल्याचा ठराव केला. त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांच्या भावना आणि पक्षाच्या निवड समितीच्या ठरावानंतर शरद पवारांनी आपला अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाचे राज्यभरातून मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

दरम्यान, पवारांनी आपण अध्यक्षपद सोडण्याचा का निर्णय घेतला याबाबतही गुरुवारी (ता. ४) कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी सांगितेल की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याचा विचार करूनच मी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतलेला होता. या निर्णयाबाबत मी तुमच्याशी चर्चा करायला हवी होती. मात्र, तुम्ही नकारच दिला असता, याची मला कल्पना होती. त्यामुळे मी हा निर्णय स्वतः घेतला. यापुढे तुमच्या भावनांचा विचार करणार आहे. त्यानुसार दोन दिवसांत तुम्हाला अंतिम निर्णय सांगतो. तुम्हाला यापुढे असे बसून आंदोलन करण्याची वेळ येणार नाही."

पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी कायम राहत असल्याचे जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT