Deepak Kesarkar Sarkarnama
मुंबई

Kesarkar On Ajit Pawar: अजित पवारांच्या 'भावी मुख्यमंत्री' बॅनरवर शिंदे गटाचे केसरकर नाराज

Political News: अजित पवारांच्या 'भावी मुख्यमंत्री' बॅनरची चर्चा; केसरकरांनी नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांना समज देण्याचे केले आवाहन

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लागले आहेत. पण काही ठिकाणी बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या ट्विटने राजकारणात खळबळ उडाली.

"मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व", अशा आशयाचं ट्विट मिटकरींनी केलं. त्यांच्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या सर्व विषयासंदर्भात शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी भाष्य करत अजितदादांनी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघणं काही चुकीचं नाही. पण आगामी निवडणुका मुख्यमंत्री शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवल्या जाणार असून त्या आम्ही जिंकणार आहोत. मात्र, सातत्याने असे पोस्टर लावले जात असतील तर त्या कार्यकर्त्यांना समज देणं त्यांच्या नेत्यांचे काम आहे", असं म्हणत त्यांनी एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली.

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले? :

"आपण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाला आपल्या नेत्याबद्दल आदर असतो. अजितदादांनी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघणं यामध्ये काही चुकीचं नाही. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, आगामी निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवल्या जाणार असून त्या आम्ही जिंकणार आहोत. पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील निवडणूक देखील आम्ही सर्वजण एकत्र लढवणार आहोत", असं ते म्हणाले.

"हे युतीचं राज्य आहे. युतीचा मुख्यमंत्री असून युतीला राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) पाठिंबा आहे. अजितदादांबद्दल मला अतिशय आदर आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. आपण हे करत असताना समोरच्या लोकांचं ज्यांच्यामुळे आपण सत्तेवर आलो त्यांची मन दुखवतात का? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठा लढा दिला. आम्ही सत्तेवर होतो, पण आम्ही सत्तेवर लाथ मारून बाहेर पडलो, असंही ते म्हणाले.

"जनतेने युतीला निवडून दिलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत केलं होतं. अजित पवारांसारखा चांगला नेता यांना देखील वाटलं की मोदी साहेबांचे नेतृत्व चांगले आहे. राज्यांत चांगलं काम सुरू आहे, त्यामुळे त्यांनीही आपला पाठिंबा युतीच्या सरकारला दिला. त्यामुळे आम्ही त्यांना आमच्यापैकी एक मानतो. त्यांच्याबद्दल आम्ही आदर ठेवतो. पण सातत्याने आपण सांगता, असे पोस्टर लावले जात असतील तर त्या कार्यकर्त्यांना समज देणं त्यांच्या नेत्यांचे काम असून जे बरोबर आले ते आमचे झाले, हीच आमची भूमिका आहे", अशी प्रतिक्रिया दीपक केसरकरांनी दिली.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT