मुंबई : अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील पोट निवडणूक तीन नोव्हेंबरला पार पडणार आहे. मात्र ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी शिंदे गटाकडून रणनिती आखण्यात आली आहे. शिवसेनेला धक्का देण्यासाठी कायदेशीर अडचण निर्माण करून, आणखी एक न्यायालयीन दणका देण्यासाठी शिंदे गटाकडून देखील आता उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
नजीकच्या पोटनिवडणूकीतसुद्धा शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू नये यासाठी, सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट न्यायालयीन लढाई लढणार आहे. या न्यायालय लढाईत शिंदे गटाकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आणि ठाकरे गटासमोर पेच निर्माण करण्यासाठी ही चाल खेळली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे शिंदे गटाची लिगल टीमने बैठक घेतली. या बैठकीत शिंदे गटाकडूनही उमेदवार द्यावा लागेल तरच न्यायालयात बाजू मांडण्यासाठी त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे, असा सर्वानुमते निष्कर्ष काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईचे पडघम लवकरच वाजतील, अशी शक्यता आहे. या कायदेशीर लढाईला आधार मिळण्यासाठी, शिंदे गट सुद्धा अंधेरीच्या पोटनिवडणुकीत एक डमी उमेदवार देण्याची शक्यता आहे. एका चिन्हावर दोन उमेदवारांनी दावा केल्याने कायदेशीर पेच निर्माण होईल. यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची शक्यता निर्माण होईल, अशी रणनीती शिंदे गटाकडून आखण्यात येत आहे. शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला असला तरी न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी शिंदे गट देखील आपला उमेदवार पुढे करू शकतो.
१२ मे रोजी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही जागा शिवसेनेकडे होती. यामुळे शिंदे गटाकडून यावर दावा करण्यात येत होता. आमदार लटके यांचे मुख्यमंत्री शिंदेंशी निकटचे संबंध होते. लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात आपण लढत करू नये, असेही शिंदे गटातील काही नेत्यांना वाटत होते. परंतु आता शिंदे गड ही निवडणूकलढवणार असल्याचे समजते.
२०१९ मध्ये शिवसेना-भाजप अशी युती असताना सदरची जागा शिवसेनेला गेल्याने भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. दिवंगत आमदार लटके यांनी १६९६५ मतांनी त्यांचा पराभव केला, तरीही ४५८०८ मते मिळवून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आताच्या पोटनिवडणूकीसाठी मुरजी पटेल यांनी निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली आहे, अशी माहिती मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.