Devendra Fadnavis-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : फडणवीस-ठाकरेंच्या एकत्र विमान प्रवासावर शिंदेसेनेच्या मंत्र्याचं भाष्य : ‘काहींच्या पोटात दुखलं असेल, काहींना चांगलं वाटलं असेल’

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला. या घटनेची राजकीय चर्चा रंगली असून शिंदेसेनेच्या वरिष्ठ नेत्याने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे

Vijaykumar Dudhale

Mumbai, 26 June : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. २६ जून) एकाच विमानातून प्रवास केल्याचे समोर आले आहे. या एकत्रित विमान प्रवासाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर आता शिंदेसेनेच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया पुढे आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या पक्ष सोडून गेलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात दौरे करत आहेत. त्यादृष्टीने ते संजय देशमुख यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात जाण्यासाठी मुंबईहून नागपूरला निघाले होते.

योगायोगाने त्याच विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आपल्या गावी (नागपूर) जात होते. दोघांनीही एकाच विमानातून प्रवास केला. प्रवासादरम्यान फडणवीस आणि ठाकरे यांनी हस्तांदोलन करून एकमेकांची विचारपूस केल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई हेही होते, त्यामुळे फडणवीस आणि ठाकरे यांच्या एकत्रित विमान प्रवासाची चर्चा राज्यात रंगली आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली आहे.

मंत्री शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानातून प्रवास करत असतील तर त्यात गैर काहीच नाही. महाराष्ट्राची संस्कृती सांगते की, आमचं राजकीय भांडण असावं. पण वैयक्तिक काही नसावं. पोटभेद असावेत; पण मनभेद नसावेत, असे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे.

एकमेकांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. ही काही वैयक्तिक, बांधाची दुश्मनी नाही. त्यामुळे ठाकरे आणि फडणवीस हे एकाच विमानात दिसले. पाहणाऱ्यांच्या काही लोकांच्या पोटात दुखले असेल काहींना चांगलं वाटलं असेल. पण आपण महाराष्ट्राची संस्कृती सोडली नाही पाहिजे. सतत भेटलं आणि बोललं पाहिजे, असा संदेश यातून या दोघांनी दिला असावा, असे संजय शिरसाट म्हणाले.

मंत्री शिरसाट म्हणाले, ही भेट नसून एकत्रित प्रवास आहे. भेट विमानात होत नसते. आमचे संख्याबळ वाढले म्हणजे आम्ही एनडीएमध्येच आहोत ना. त्यामुळे त्या भेटीचा आणि या राजकारणाचा काहीही अर्थाअर्थी संबंध नाही. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात गेलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्यातून त्यांना तिकडची परिस्थिती कळेल ना. त्यांनी केलेल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी केलेला उद्वव ठाकरेंचा दौरा आहे. त्यामुळे ठाकरे-फडणवीस भेट ही सर्वसामान्य आहे. एकेमकांशी भेटणं आणि हस्तांदोलन करणं म्हणजे पक्षात काही हालचाल चालू आहे, असं नाही.

ठाकरे, फडणवीस आणि शिंदे हे परिपक्व नेते आहेत. या छोट्या गोष्टीतून एकमेकांच्या विरोधात बोललं किंवा भेट झाली, असं काही होत नसतं. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत अनेक वर्षे काम केलं आहे. देवेंद्र फडणवी यांच्यासोबत काम करत आहोत. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ लावू नका, असे आवाहन शिरसाट यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT