Aaditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचा 'लेटर बॉम्ब'; 'गद्दारांच्या टोळीमुळे...'

Ganesh Thombare

Mumbai News: लोकसभा निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष कामालाही लागले आहेत. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाने राजकारण तापलं आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे.

या पत्रात आदित्य ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. देशातील लोकशाहीच्या मूल्यांचं खच्चीकरण करण्यात येत असल्याचा मुद्दा मांडत जेथे हुकूमशाही निर्माण झाली, तेथे कोणाचंही भलं झालेलं नाही, असं ठाकरेंनी म्हटलं. तसेच तुमचं मत मौल्यवान असून या मतावर आपलं भविष्य अवलंबून आहे. सोबत लढलो तर सत्याचा विजय होईल, असं आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आदित्य ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं ?

'महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणणं हे आपलं ध्येय आहे. 2022 मध्ये गद्दारांच्या टोळीने आपल्या प्रगतशील महाराष्ट्राचं रूपांतर 'बिल्डर्स-कंत्राटदार' मिळून चालवत असलेल्याला एका राजवटीत केलं. या खोके सरकारच्या भ्रष्टाचारामुळे आपल्या राज्यातील शहरं उद्धवस्त होत आहेत. विकासाच्या अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार होत आहे', असा गंभीर आरोप ठाकरेंनी केला.

'ज्यांनी लोभापायी स्वतःला विकलं, ते आपलं भविष्य विकायला मागेपुढे बघणार नाही, मग या गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची प्रगती, तुमची प्रगती होईल का ?,' असा सवालही त्यांनी जनतेला केला आहे. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना मदत सरकारकडून होत नाही. हे खोके सरकार फक्त बॅनरवर दिसत आहे, हे भयानक आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

'एक आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखताना कॅमेऱ्यात कैद झाला. एवढंच नाही तर पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याचीही बातमी समोर आली होती. मात्र, आता त्याच आमदाराला सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचं अध्यक्ष करण्यात आलं. मग हे हिंदुत्व तुम्ही स्वीकारणार का ?', असा सवाल ठाकरेंनी जनतेला केला.

'या सरकारमधील एक मंत्र्याने महिला खासदारांना शिवीगाळ केली. याच सरकारमधील काही आमदार अधिकाऱ्यांना फोन करून धमक्या देतात. पण यानंतर त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली. गेल्या दोन वर्षात अनेक उद्योग गुजरातला पळवले गेले. मग आता आपण आपल्या शहरासाठी, राज्यासाठी काय हवं ? हे ठरवायला हवं', असं आवाहन आदित्य ठाकरेंनी जनतेला केलं आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT