Aditya Thackeray on Tanaji Sawant News Updates, Aditya Thackeray News Sarkarnama
मुंबई

'आदेशाची वाट बघतोय' म्हणणाऱ्या सावंतांना आदित्य ठाकरेंचा सूचक संदेश

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला होता.

सरकारनामा ब्युरो

रत्नागिरी : शिवसेना (Shiv Sena) आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला होता. त्यांनी थेट महाविकास आघाडीवरच बोट ठेवलं. आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल, तोवर सहन करू. आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही, असं म्हणत त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याबाबतचे सूचक वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही त्यांना सूचक संदेश दिला आहे. (Aditya Thackeray News)

सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात युवा सेनेचा सोमवारी (ता. २८ मार्च) मेळावा झाला. त्यात सावंत यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीवर (NCP) चौफर टीका करत सभागृह दणाणून सोडले. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता. महाविकास आघाडीच्या मागील अडीच वर्षांच्या काळात आपला केवळ अपमानच झाला आहे. आपला केवळ अपमानच होणार असेल, तर साहेब विचार करायला हवा, असे आवाहन त्यांनी युवा सेनेचे सचिव सरदेसाई यांना केले होते.

कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांना सावंत यांच्या या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक जण कुठला तरी पालकमंत्री असतो. मीही मुंबई उपनगरचा पालकमंत्री आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. जिथं दोन पक्ष एकमेकांविरोधात लढतात, तिथे खदखद असतेच. आम्ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आघाडीचे नेते एकत्रित बसून महाराष्ट्रासाठी ही आघाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो असून राजकारणात थोडंफार पुढे-मागे होत असतं, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

सत्तेतून बाहेर पडण्याबाबत सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे म्हणाले, हे त्यांचं वैयक्तिक मत असेल. प्रत्येक मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. याआधीही आणि आताही सर्वांना समान न्याय दिला जात आहे. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं म्हणत ठाकरे यांनी सावंत यांचे आरोप फेटाळून लावत त्यांना जणू सूचक संदेश दिल्याची चर्चा आहे.

काय म्हणाले तानाजी सावंत?

राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) ग्रामपंचायत सदस्यदेखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे जाऊन २५-१५ योजनेतून एक-एक, दीड-दीड कोटी रुपयांची कामे आणतो आणि येथे येऊन आमच्या छाताडावर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही, ते यांच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळते. आम्हाला केवळ गोड बोललं जात, अशी खंत तानाजी सावंत यांनी व्यक्त केली. ‘आमच्यामुळे हे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमचीच घडी विस्कटण्याचा प्रयत्न ते करत आहेत, ते आम्ही खपवून घेणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.

आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल, तोवर सहन करू. आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही. सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? केवळ स्टेजवर बोलण्यापुरते भाजपवाले तुमचे विरोधक आहेत का? की आतून तुमची त्यांच्याशी सेटिंग आहे? शिवसेना विश्वासघात सहन करणार नाही, असा संदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला देण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT