Bhaskar Jadhav

 

Sarkarnama

मुंबई

भास्कर जाधव झुकले अन् सभागृहाची बिनशर्त माफी मागितली

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) पहिल्याच दिवशी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नक्कल केल्याचा मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे सभागृह काही काळासाठी तहकूब करावे लागले. जाधवांनी माफी मागितल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला.

काहीवेळाने सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा जाधव यांनी माफी मागण्याची मागणी उचलून धरली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहाची बिनशर्त मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जाधव म्हणाले, सभागृहात मी माफी मागावी, असा आग्रह विरोधक करत आहेत. अशाप्रकारच्या प्रसंग या सभागृहात अनेकदा आले. माफी मागणं किंवा दिलगिरी व्यक्त केल्यानं माणूस लहान होत नाही. पण विरोधी पक्षनेत्यांनी शब्दच्छल केला. मी नेहमी बोलत असताना कळत न कळत हातवारे होतात. तरीही मी बोलण्याच्या ओघात पंतप्रधानांविषयी नक्कल केली असेल तर मी सभगृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो, असं जाधव यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, वीजबिलाच्या मुद्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) विधानसभेत उत्तर देत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 लाख रुपयांच्या घोषणाचा उल्लेख केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतला. राऊत यांनी याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी, असं खुलं आव्हान फडणवीस यांनी दिलं. फडणवीस आक्रमक झाल्यानंतर भास्कर जाधव राऊतांच्या मदतीसाठी धावून आले.

जाधव म्हणाले, विरोधी पक्षनेते शब्दखेळ करत आहेत. 2014 पूर्वी पंतप्रधान हे बोलले आहेत. 'काला धन लाने का की नही लाने की, कहा रखने का,' असं मोदी म्हणाल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर फडणवीस पुन्हा आक्रमक झाले आणि पंतप्रधानांची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना निलंबित करा. बहुमताच्या भरवशावर अशी नक्कल करत असाल तर त्याची लाज वाटली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

पंतप्रधानांनाबाबतचे अंगविक्षेप जे करत आहेत, ते सहन केले जाणार नाही. आम्हीही उद्या यांच्या नेत्यांची नक्कल केली तर सभागृहाला चालेल का. देशाचे पंतप्रधानांबाबत असं बोलणं सहन केले जाणार नाही. जाधव यांनी माफी मागितली पाहिजे. तुमच्या नेत्यांचा आम्ही अवमान करायचा का, आम्हालाही नकला येतात. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान जाधव करत असतील तर ते सहन केले जाणार नाही. असे फडणवीस म्हणाले. यावेळी भाजपचे सर्व आमदार गोळा झाले आणि त्यांनी माफी मागा माफी मागा, अशी घोषणाबाजी सुरू केली.

त्यावर जाधव यांनी खुलासा करताना 15 लाख रुपये पंतप्रधान असे कधी बोलले नाही. ते पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले. याचा अर्थ मी पंतप्रधानांची नक्कल केली नाही. एका उमेदवाराची नक्कल केली आहे, असे म्हटले. अखेर विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून जाधव यांनी अंगविक्षेप व शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केले. पण त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. जाधव यांनी माफी मागण्याची मागणी त्यांनी लावून धरली. अखेर गदारोळ वाढत गेल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT