मुंबई : राज्याच्या विधिमंडळात शिवसेनेचा (Shiv Sena) नेमका पक्षनेता, प्रतोद कोण यावरून कायदेशीर लढाई सुरू असतानाच आता लोकसभेतील पक्ष प्रतोदही बदलण्यात आले आहेत. खासदार भावना गवळी यांना पक्षानं दणका दिला असून त्यांना या पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्याजागी खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Bhavana Gawlai Latest News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पाठराखण करणं, भावना गवळी यांना भोवल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार संजय राऊत यांनी संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांना याबाबतचे पत्र लिहून कळवले आहे. शिवसेना संसदीय पक्षाने तातडीने ही नियुक्ती केली असल्याचे राऊतांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
बंडखोर आमदारांच्या संपर्कात सेनेचे बारा खासदार असल्याचा दावा आमदार गुलाबराव पाटील यांनी बुधवारी केला आहे. तसेच इतर बंडखोर आमदारांकडूनही तसे संकेत मिळत आहेत. त्यातच सेनेने भावना गवळींना प्रतोद पदावरून हटवल्यानं खासदारही महाविकास आघाडीच्या मुद्दावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याबाबतच्या चर्चांना ऊत आला आहे. विधानसभेत झालेली कोंडी लोकसभेत होऊ नये म्हणून हा बदल केल्याचे समजते.
गवळी यांनी लिहिलं होतं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्र लिहिलं होतं. बंडखोरांवर कारवाई न करता आता निर्णय घ्यावा, असं पत्रात म्हटलं होतं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा, ही विंनती करत, असं गवळी यांनी पत्रात म्हटलं होतं.
राहुल शेवाळे यांनीही केली कोंडी
आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, या मागणीचं पत्र खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता आल्यानंतर शेवाळे यांनी ही मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.