Sanjay Raut Vs Amit Shah Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut Vs Amit Shah : संजय राऊत अमित शाह यांच्यावर संतापले; म्हणाले, 'आम्ही काय गोट्या खेळत होतो का?'

Sanjay Raut criticizes Amit Shah : भाजप नेते अमित शाह यांनी 'बॉम्बे'चे नाव 'मुंबई' करण्याच्या विधानावर संजय राऊत चांगलेच फटकारले.

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'बॉम्बे'चे नाव 'मुंबई' करण्यात आमचा हात होता, या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच भडकले.

"आम्ही काय गोट्या खेळत होतो का? असा सवाल करत अमित शाह यांच्या या विधानावर हसू येते. भाजपची लोकं देखील शाह यांच्या या विधानावर मुर्खासारखी टाळ्या वाजतात, याची देखील कीव येते", अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारलं आहे.

भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लालबागचा राजाचं दर्शन घेऊन, महायुतीमधील नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका करत लालबागचा राजा गुजरात घेऊन जाण्याची भीती व्यक्त केली होती. संजय राऊत यांच्या या भीतीवर भाजपने जोरदार हल्ला चढवला. यातच अमित शाह यांनी काल 'बॉम्बे'चे नाव 'मुंबई' करण्यात या मोटा भाईचा हात होता, असे विधान केलं. शाह यांच्या या विधानावर संजय राऊत चांगलेच भडकले. 'आम्ही काय गोट्या खेळत होतो का?' असा सवाल केला.

संजय राऊत म्हणाले, "आम्ही काय गोट्या खेळत होतो का? बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena) यांनी सर्व पातळीवर मुंबईच्या नावासाठी आंदोलन छेडलं होते. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आणि हे भाईसाहेब म्हणतात, 'आम्ही केलं'. त्यामुळे भीती वाटते. उद्या म्हणतील, लालबाग राजाचा निर्मिती आम्हीच केली". पण हे विसरतात मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मराठी लोकांचा मुंबईवर पहिला हक्क आहे. 105 जणांच्या बलिदानावर मुंबई निर्माण झाली आहे, हे विसरू नका! ही मुंबई तोडण्याचा प्रयत्न हे लोकं करत आहेत. तोडू शकत नाही, म्हणून मुंबईला कंगाल केलं जात आहे. त्यामुळे भीती वाटत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं.

भाजपकडे सत्तेचा जोर

अमित शाह आले पाहिजेत, त्यांनी यावं, ते भाजप नेते आहेत. देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी मुंबईला यावं. लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावं. लालबाग राजाची संपत्ती वाढत आहे. लोकांची श्रद्ध आहे. लालबाग राजाची प्रतिष्ठा आहे. परंतु नरेंद्र मोदी-अमित शाह सर्व काही मुंबईतून गुजरातमध्ये घेऊन चाललेत. यातच अमित शाह यावेळी लालबाग राजाच्या दर्शनाला आल्यामुळे भीती वाटली. लालबाग राजाचा उत्सव गुजरातमध्ये घेऊन जाऊ शकतात. लालबाग राजा मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचा अभिमान आहे. आमचं जिव्हाळ्याचं नातं आहे. परंतु भाजप गुजरातच्या व्यापारी मंडळासाठी सत्तेच्या जोरावर काहीही करू शकतात, अशी भीती संजय राऊत यांनी पुन्हा व्यक्त केली.

भाजचा झुंड म्हणून उल्लेख

भाजपकडून वारंवार महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर अमित शाह यांनी अजून माफी मागितली का? देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली का? गुजराती व्यापारी मंडळाचा फायदा व्हावा म्हणून, मुंबई ओरबडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आम्हाला भीती वाटते. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी अमित शाह यापूर्वी देखील आले होते, त्यावेळी आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का? पण आता हे भय वाढलं आहे. हे सत्तेच्या बळावर मुंबईतून काहीही उचलून नेवू शकतात. ही झुंड आली आहे, लालबागच्या संदर्भात वेगळा निर्णय घेतल्यास, असे अनेक प्रश्न श्रद्धाळू म्हणून मनात येत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT