Shiv Sena Split News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले आहेत. या खासदारांनी स्वतंत्र गट करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यांनी तसे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडूनच केला जात आहे. त्यानंतर आता ठाकरेंचे टेन्शन वाढविणारी अपडेट मुंबईतून समोर येत आहे.
ठाकरेंचे सहा खासदार फुटल्यानंतर आमदार आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवकही फुटणार असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून केला जात आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी तसे विधानही केले आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतील बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या नगरसेवक कन्या राजुल पाटील यांच्या भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे.
संजय दिना पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या गुरूवारी बोलविण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे तेही शिंदेंकडे जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यात राजुल पाटील याही बुधवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात अनुपस्थित राहिल्या. ठाकरेंच्या सेनेचे एकूण ६५ नगरसेवक असून बुधवारच्या बैठकीला राजुल वगळता सर्व ६४ नगरसेवक उपस्थित होते. त्या सुरक्षेच्या कारणास्तव घरीच थांबल्याची चर्चा बुधवारी महापालिकेत होती.
मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावर भाष्य केले होते. संजय दिना पाटील यांच्या कन्येचा एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे. गद्दार गेले, कन्येचे नंतर बघू, असे पेडणेकर म्हणाल्याचे वृत्त आहे.
संजय पाटील हे बुधवारी मुंबईतच होते, अशीही चर्चा आहे. ते गुरूवारच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने शिंदेंसोबत जाणार असल्याचे मानले जात आहे. अद्याप त्यांनी उघडपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अद्याप राजुल याही बंडखोरीबाबत उघडपणे बोलल्या नाहीत. त्या युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्यही आहेत.
४५ नगरसेवक गळाला?
शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी ठाकरेंच्या पक्षाचे ४५ नगरसेवक संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत ऑपरेशन टायगर पूर्ण होईल, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतही ठाकरेसेनेला खिंडार पडणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.