Rajya Sabha Election , Sanjay Raut Latest marathi News  Sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्री ठाकरेंचं ठरलं! राज्यसभेसाठी सहावा उमेदवार कट्टर शिवसैनिकच असणार

शिवसेनेकडून संजय राऊत यांच्यासह आणखी एक उमेदवार दिला जाणार आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभेसाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाला शिवसेनेकडून आता पुर्णविराम मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना मंगळवारी त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. दोन जागांसाठी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह कट्टर शिवसैनिकाला संधी दिली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता दुसरं नाव कोणतं, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Shiv Sena Latest Marathi News)

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जेष्ठ शिवसैनिकाचे नाव जाहीर केले जाऊ शकतो. त्यानंतर येत्या येत्या २६ मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत आणि उद्या जाहीर होणारे उमेदवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

संभाजीराजे यांना शिवसेनेची ऑफर नाकारल्याचे समजते. ते पहाटेच मुंबईतून कोल्हापूरला रवाना झाले आहेत. तसेच राऊतांनीही सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी दिली जाईल, असं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे संभाजीराजे यांच्या नावाला पूर्णविराम देण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे.

शिवसेना (Shiv Sena) नव्हे तर महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून अपक्ष निवडणूक लढविण्याची संधी द्यावी, यावर संभाजीराजे ठाम आहेत. कुठल्याही पक्षात गेल्यास मराठा समाज दुखावला जाईल, समाजासाठी संघटना काढली आहे, पक्ष नाही, अशी त्यांची भूमिका आहे. पण सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करत आपल्या परीने मतांची जुळवाजुळवही सुरू केल्याची माहिती आहे.

राऊतांनी सांगितली ठाकरेंच्या 'मन की बात'

संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शिवसेना दोन जागा लढवणार आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि निवडून आणू, अशी शिवसेनेची भूमिका आहे. आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. आम्ही त्यांना शिवसेनेत येऊन पक्षाचे उमेदवार व्हा, असं सांगितलं. आता निर्णय त्यांचा आहे. पण कोणत्याही परिस्थितीत दोन उमदेवार हे शिवसेनेचेच निवडून जातील. ते पक्के शिवसैनिक असतील. हे मी उद्धव ठाकरे यांच्यावतीनं सांगत आहे. ही त्यांच्या 'मन की बात' आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

ही आहेत संभाव्य नावं...

शिवसेनेतून माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील किंवा मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तिघेही कट्टर शिवसैनिक असून ज्येष्ठ आहेत. तिघांपैकी एकाला उमेदवारी देण्यामागे वेगवेगळी राजकीय गणितं मांडली जात आहेत. त्यामुळे या तिघांपैकीच एक उमेदवार असू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT