Kalyan Dombivali Banners
Kalyan Dombivali Banners  Sarkarnama
मुंबई

Shivsena-BJP: दिव्याचे बॅनर डोंबिवलीत झळकले; शिंदे-भाजपाचे इथेही सूत जुळेना !

शर्मिला वाळुंज

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यातील विकासकामांचा शुभारंभ बुधवारी दिवा येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र, डोंबिवलीत झळकणाऱ्या एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी स्वागतासाठी बॅनर लावला आहे. त्यावर शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत. दिव्यातील पदाधिकाऱ्यांचे बॅनर डोंबिवलीत झळकल्याने चांगलीच चर्चा रंगली. पण भाजप आणि शिंदे गटाचे येथेही सूत जुळत नसल्याची चर्चा यानंतर सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात हा कार्यक्रम होत असल्याने शिवसेना पदाधिकारी कामाला लागले आहेत.

त्यातच डोंबिवलीत स्टेशन आणि इतर परिसरात झळकणारा बॅनर साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ.शिंदे आणि स्वतः मढवी यांचे फोटो असून इतर कुणाचेही फोटो झळकवण्यात आलेले नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या बॅनरवर स्थान देण्यात आलेले नाही. याबरोबरच कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांचाही फोटो नाही. दिव्यातील बॅनर डोंबिवलीत झळकल्यामुळे आधीच चर्चा रंगली असताना आता त्या बॅनरवर असणाऱ्या फोटोंनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता होती. पण याच महापालिकेचा भाग असलेल्या दिवा शहरातील भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते कधीच एकत्र आले नाही. ते कायम एकमेकांच्या विरोधात बोलत आले. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्ती समजले जाणारे भाजपचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण व शिवसेना यांच्यात दरी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

चव्हाण यांची आधीच ठाणे येथून कोंडी होत असताना कल्याण लोकसभेची जागा लढवण्याची तयारी भाजपकडून केली जात असल्याने या नाराजीत आणखी वाढ झाल्याचे बोलले जात आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपाची युती आतापर्यंत अभेद्य असताना दिवानंतर येथेही आता दोघांत बिनसू लागल्याची चर्चा आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयातून झळकवण्यात आलेल्या बॅनरवर भाजपाला स्थान देण्यात आले नाही. यामुळे राज्यात युती असली तरी तळागाळातील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्येमध्ये मात्र धुसफूस सुरू असल्याचे दिसते.

माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मढवी म्हणाले, "हे शिवसेनेच्यावतीने लावलेले बॅनर आहेत. दिव्यात शिवसेनेचे भाजपासोबत किती सख्य आहे हे सगळ्यांना माहीत आहे. विरोध करणारी भाजप ही कितीही निमंत्रण दिलं तरी येणार नाही. मग बॅनरवर तरी यांचे फोटो कशाला टाकायचे", असं ते म्हणाले.

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT