Aaditya Thackeray News  Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray News : ठाकरेंच्या शहरप्रमुखावर गुन्हा, पण आरोप शिंदेंच्या खासदारावर; विनापरवाना मंडप

Maharashtra Politics : आजच्या आरतीला आदित्य ठाकरेंबरोबर आमदार सचिन अहिर हेही उपस्थित असणार आहेत.

उत्तम कुटे

Pimpri News : या वर्षी गणेशोत्सव गतवर्षापेक्षा दणक्यात साजरा झाला, तसाच नवरात्रही. त्यासाठी राज्य सरकारने मंडळांना मंडप शुल्क माफ केलं. पण, परवानगी घ्यावी लागते आहे. ती न घेता अनेकांनी भर रस्त्यातच नवरात्रात मंडप उभारून वाहतुकीला शहरात अडथळा आणला. त्याबद्दल पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, त्यांचे मंडळ आणि पदाधिकारी यांच्यावर स्थानिक वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आश्चर्याची बाब म्हणजे भोसले कायद्याचे ज्ञान असलेली (वकील) व्यक्ती आहे.

अत्यंत वर्दळीचा असा डांगे चौक-वाकड हा वाकड पोलिस ठाण्याकडे जाणारा रस्ता बंद करून तेथे कीर्तन घेत वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या भोसले या आपल्या पदाधिकाऱ्याच्या ॲड. सचिनभाऊ भोसले युवामंच आणि न्यू आझाद युवा संघाच्या नवरात्र आरतीसाठी य़ुवा सेनाप्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आज सायंकाळी थेरगावात येणार आहेत. तेथून जवळच शिंदे शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे निवासस्थान आहे. त्यांचे नाव न घेता राजकीय दबावातून हा गुन्हा आपल्याविरुद्ध दाखल झाल्याचे भोसलेंनी `सरकारनामा`ला आज सांगितले. त्यांचा रोख बारणेंकडेच होता.

चिंचवड विधानसभा पोटनिव़डणुकीच्या प्रचारात बरोबर आठ महिन्यांपूर्वी (२२ फेब्रुवारी) भोसलेंना त्यांच्याच प्रभागात ताजा गुन्हा घडलेल्या ठिकाणीच म्हणजे मंगलनगर येथे मारहाण झाली होती. त्यावेळी त्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली असताना ही घटना घडली होती. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पराभूत भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा दावा भोसलेंनी त्यावेळी केला होता.

शिक्षेची तरतूद काय?

अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर परवानगी न घेता मंडप उभारून तेथे ते दररोज कीर्तने घेत आहेत. त्यामुळे गर्दी होऊन हा रस्ताच बंद होत आहे. शहरात पोलिस आयुक्तांचा मनाई आदेश लागू आहे. त्याचा भंग करीत ही गर्दी जमवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसलेंविरुद्धच्या गुन्ह्यात त्यांना अटक होण्याची शक्यता नसल्याचे वाकड पोलिसांनीच सांगितले. त्याबद्दल कोर्टात चार्जशीट दाखल केले जाईल, असे सांगण्यात आले. त्यात दंड वा तीन महिने शिक्षा होऊ शकते. दरम्यान, भोसलेंच्या नवरात्र मंडळाच्या आजच्या आरतीला आदित्य ठाकरेंबरोबर शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर हेही असणार आहेत. आजही आरतीनंतर तेथे पुन्हा दररोजचे कीर्तन होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT