Dasara Melava 2023 : हा अतिविराट मेळावा सांगतोय... अब की बार ठाकरे सरकार... अब की बार की ठाकरे सरकार... महाराष्ट्रात आणि दिल्लीतसुद्धा. हिंमत असेल तर टक्कर द्या, असं आव्हान देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणाला दणक्यात सुरुवात केली आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा? असे फालतू प्रश्न विचारण्यात आले. शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. मेळावा एकच शिवसेनेचा शिवतीर्थावरचा. दुसरा मेळावा आम्ही ढुंकूनही पाहिला नाही.
आणि हा महाराष्ट्रही ढुंकून पाहत नाही. डुप्लिकेट चायनीज माल येतो आणि जातो. या चायनीज मालाचा फटाका कधी फुटत नाही. हा समोर दिसतोय तो मराठा तितुका मेळवावा. आणि तिकडे सुरुये मराठा तितुका लोळवावा, अशी टीका संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
फूट पाडायची मराठी माणसात आणि महाराष्ट्रात. या महाराष्ट्राचे तुकडे करायचे. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसांची निर्माण केलेली एकजूट तोडायची. या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला नख लावायचं.
त्यामुळे शिवसेनेचा मेळावा इथे आणि तिकडे सुरू आहे. भाजपच्या दोन फुल्यांची मस्ती आणि माज आहे. आणि पुढल्या वर्षी २०२४ ला पूर्णपणे उतरेल, असा इशारा राऊत यांनी दिला.
मागच्या मेळाव्याला माझी खुर्ची रिकामी होती. गेल्या दसरा मेळाव्याला मी तुरुंगात होतो. १०० दिवस तुरुंगात होतो. बाळासाहेबांचा शिवसैनिक मोडला नाही, खचला नाही, मनाने तुटला नाही आणि माघारही घेतली नाही. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी घडवलं आहे. हा निखारा आहे. बाळासाहेबांनी धगधगते निखारे निर्माण केले, असं संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी रोज म्हणतात भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही. सबको पकड पकड कर भाजपमध्ये शामील कर लुंगा, असा हा भाजप आहे. हा भाजप महाराष्ट्रावर, देशावर राज्य करतोय आणि महाराष्ट्राचं नुकसान करतोय. भाजप नेत्यांचं आणि त्यांच्या दुतोंडीपणाचं आश्चर्य वाटतंय. पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत.
आणि या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. घोटाळेबाजांना उलटे लटकवू, असं छत्तीसगडमध्ये अमित शाह म्हणताहेत, मग महाराष्ट्रात घोटाळेबाजांची पप्पी का घेत आहेत? महाराष्ट्रात काय चाललंय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
४० आमदार ५०-५० कोटी घेऊन शिवसेनेतून फुटले. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना लटकवण्याची भाषा करताय ना? मग आधी त्या ४० आमदारांना उलटं लटकवा. आम्ही तुमचा या शिवतीर्थावर सत्कार करू. एकनाथ शिंदे हाच एक मोठा घोटाळा आहे.
तो शिवसेनेत आला हा घोटाळा. त्याला मंत्री हा घोटाळा आणि आता भाजपमध्ये गेले हा महाघोटाळा आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.