Balasaheb Thackeray, Sharad Pawar: Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thackeray On Sharad Pawar: मैद्याचं पोतं, म्हमद्या अन् शरद पवार...मैत्रीचं अनोखं नातं

प्रसाद जोशी - Guest Sarkarnama

Shivsena Dasara Melava : जगाच्या पाठीवर कुठेही असणाऱ्या मराठी माणसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या नावामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव अग्रक्रमाने येते. सहा दशकांपेक्षा जास्त काळ या नावाने मराठी माणसाच्या मनाला गारुड घातलेले आहे.

रोखठोक भूमिका, विधानावर ठाम राहण्याची वृत्ती, हृदयाला भिडणारी भाषाशैली यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती महाराष्ट्रातील युवावर्ग आकृष्ट झाला. केवळ आकृष्टच नाही तर बाळसाहेब ठाकरेंनी दिलेल्या आदेशाला शिरसावंद्य मानण्यास तत्पर झाला. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. गावोगावी शिवसेनेच्या शाखा स्थापन झाल्या आणि गळ्यात भगवा रुमाल घातलेल्या युवकांची फौज निर्माण झाली. व्यंगचित्राचे फटकारे आणि भाषण हे बाळासाहेबांचे दोन शस्त्र.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार हे त्यांचे प्रमुख लक्ष्य असायचे...

संघटनेचे वैचारिक अधिष्ठान मजबूत करण्यासाठी बाळासाहेबांनी विजयादशमीला दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्याचे ठरवले. तेही शिवाजी पार्कसारख्या मैदानावर दि. २६ ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. मुंबईकरांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे भाषण ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक विजयादशमीला शिवाजी पार्कवर यायचा. शिवसेनाप्रमुखांचे प्रेरणादायी विचार ऐकून वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन जायचा. दसऱ्याच्या भाषणातून बाळासाहेब मराठी माणूस, हिंदुत्व आणि वैचारिक व राजकीय विरोधकांचा समाचार घेत असत. टीका करताना तत्कालीन काँग्रेसचे नेते शरद पवार हे त्यांचे प्रमुख लक्ष्य असायचे. त्यासाठी 'मैद्याचं पोत', 'म्हमद्या' अशा शब्दांचा उल्लेख बाळासाहेब करत.

इमामांना पेन्शन देण्याचा विचार आणि बाळासाहेब

वर्ष १९९४ मध्ये झालेल्या दसऱ्या मेळाव्याचे भाषण अजूनही समाजमाध्यमात लोकप्रिय आहे. या भाषणानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार निवडून आले. या भाषणात बाळासाहेबांनी तत्कालीन कॉंग्रेसचे नेते व मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर टीका करताना अतिशय कट्टर हिंदुत्ववादी विचार मांडले आहेत.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील मस्जिदमधील इमामांना पेन्शन देण्याचा विचार केला होता व यासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मस्जिदमधील इमामांची संख्या व अपेक्षित खर्चाची माहिती मागवण्यात आली होती. यावर बाळासाहेबांनी सडकून टीका करताना सांगितले होते की," असा निर्णय घेताना शरद पवारांना लाज कशी वाटत नाही. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतरही मस्जिदवरील भोंगे चालूच असून, ते कधी बंद करणार" असा सवालही विचारला होता.

पवार खाजवतील तिथून पैसा

खासगीकरणाच्या धोरणाला पाठिंबा देताना सांगितले की,"देशाच्या, महाराष्ट्राच्या व लोकांच्या हिताचे असेल ते केलेच पाहिजे. म्हणून खासगीकरण पाहिजे; पण शरद पवारांसारखे नको, म्हणजे शरद पवार जिथे खाजवतील तिथून पैसा काढतात."

शरद पवार लुटणाऱ्यांचा बाप...

भाषणाचा समारोप करतानासुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना टोला हाणला होता. त्यांनी म्हटले होते की,"इथून जाताना शिवसेना-भाजप युतीचा भगवा झेंडा विधानसभेवर फडकवायचाच अशी शपथ घेऊन सोने लुटा, अन्यथा लुटायला शरद पवार आहेच, शरद पवार लुटणाऱ्यांचा बाप आहे."

धान्यापासून दारू बनवण्याच्या शरद पवार यांच्या विचाराचा समाचार घेताना २०१० झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी सांगितले की, "राज्यात कुपोषण आहे, लोकांना खायला मिळत नाही. उपाशीपोटी मरत आहेत आणि तुम्ही धान्यापासून दारू बनवताय."

म्हाताऱ्या बाईला खूष कशासाठी करता...

२०११ मध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. सी लिंकला राजीव गांधी यांचे नाव दिल्याने चिडलेल्या बाळासाहेबांनी सांगितले होते की, "सोनिया गांधीना खूष करण्यासाठी शरद पवारांनी सी लिंकला राजीव गांधी यांचे नाव दिले. म्हाताऱ्या बाईला खूष कशासाठी करता अशी कोपरखळीही मारली होती."

व्यक्तिगत जीवनात घनिष्ठ कौटुंबिक संबंध

असे असले तरी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील वैमनस्य केवळ राजकीय पातळीपुरते मर्यादित होते. व्यक्तिगत जीवनात त्यांच्यात घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. अराजकीय व्यासपीठावर त्याची कबुलीसुद्धा जाहीरपणे देत होते. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या लोकसभेच्या रिंगणात उतरल्या तेव्हा त्यांच्याविरुद्ध शिवसेना उमेदवार देणार नाही, असा शब्द देत बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सांगितल्याप्रमाणे उमेदवार दिला नव्हता.

राजकीय वैमनस्य असतानाही व्यक्तिगत जीवनात मैत्री सांभाळण्याचा कला दोघांनाही अवगत होती. विशेषतः सध्याच्या राजकीय वैमनस्य व्यक्तिगत जीवनात नेण्याच्या काळात दोघांची मैत्री एकमेवाद्वितीय आहे आणि म्हणून आदर्शसुद्धा आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT