Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली आहे. यामुळे शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुखांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरककार कोसळले आहे. यानंतर बंडखोर आमदार आणि भाजपच्या (BJP) साथीने शिंदे यांनी राज्यात नवं सरकार स्थापन केली आहे. मात्र, तरीही शिवसेनेला ते धक्के देतच असून पक्षावरच त्यांनी दावा केला आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून बंडखोरांवर हल्लाबोल केला जात आहे. युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज आपल्या निष्ठा यात्रेदरम्यान वडाळा येथील शाखा क्रमांक १८४ ला भेट दिली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांवर हल्लाबोल केला. (Aditya Thackeray Latest News)
आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधत असताना वरुणराजाने हजेरी लावली. यावेळी आदित्य यांनी छत्री न घेता भरपावसात भिजत शिवसैनिकांशी संवाद साधला. याला जमलेल्या शिवसैनिकांनी देखील उदंड प्रतिसाद देत पावसात भिजत त्यांना साथ दिली. आदित्य यावेळी बोलतांना म्हणाले की, आपलं सरकार परत येणार असून सध्या जे काही सुरू आहे ते एक नाटक असून हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आदित्य यांनी बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातील शाखा क्रमांक २१२ ला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत विजय आपलाच होणार, असा विश्वास व्यक्त केला. आग्रीपाडा येथे आयोजित निष्ठा यात्रेला शिवसैनिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात जमलेल्या शिवसैनिकांनी आपण ठाकरे परिवारासोबतच आहोत, असा विश्वास दिला.
यावेळी आदित्य यांनी तुम्ही व्यक्ती म्हणून मत दिल की पक्ष म्हणून?, असा त्यांनी शिवसैनिकांना सवाल केला. यावेळी शिवसैनिकांनी पक्ष म्हणून जोरात उत्तर दिलं. पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या महिन्या भारत महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे, पण हे का होतंय ते कळत नाही. काय नेमकं आपण यांना कमी दिलं? इथे येत असताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वाईट वाटतं, ज्या लोकांवर विश्वास ठेवून पद ताकद दिली. ज्याला आपण मतदान केलं तो शिवसैनिक म्हणून काम करेल अशी अपेक्षा होती, म्हणून विश्वास टाकला. एक महिन्यापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, राग येण्यापेक्षा दुःख होतं; पाठीत खंजीर खुपसून गेले. जे दबाव टाकून शिवसैनिकांना बाजूला करत होते, ज्यांना आपण सर्वांनी प्रेम दिलं ते लोक असं वागतील असं वाटलं नव्हतं, असं आदित्य म्हणाले.
ते म्हणाले, वेगळ्या ठिकाणाहून दबाव टाकला असावा. तुम्हाला जायचं होतं तर जा, सुखी रहा, आमच्या मनात हृदयात तुमच्याबद्दल वाईट नाही, आमच्या मनात अजून वाईट नाही, म्हणून तुमच्या समोर उभे आहोत. तिकडे गेलात तर आमच्या शिवसैनिकांना का त्रास देताय? व्हिडिओ कृत्य सुरू आहेत, हे योग्य नाही. लपून छपून हमले सुरू आहेत हे योग्य नाही. जे पळून गेलेत त्यांच्यावर दडपण आहे. काही लोकांना पळवून नेलं आहे, पण जिंकणार आपणच, कारण आपण कायद्याच्या बाजूने आहोत. ज्यांना परत यायचं आहे, त्यांना 'मातोश्री'चे आजही दरवाजे खुले आहेत, पण ज्यांना यायचं नाही त्यांनी, तुम्हाला लाज असेल तर राजीनामा द्या आणि जनतेचा कौल घ्या, असे म्हणत बंडखोरांना आव्हान केले.
गेले ते गेले ठाकरे परिवार, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करू लागलेत, आम्ही तुमचं काय वाईट केलं, असा सवालही आदित्य यांनी उपस्थित केला. गेल्या अडीच वर्षात जाती धर्मात वाद झाले नाहीत, कोविड काळात महाराष्ट्र मॉडेल प्रसिद्ध झालं, आरे वाचवलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हणून चांगलं काम करत आहेत, असं सगळं सांगत होते. ज्यांना आपण काही देत नाही, ते आपल्या सोबत रहातात, पण ज्यांना आपण देतो त्यांना अपचन होतं, ते जेलिसील घ्यायला इतरत्र जातात. आपण कुठेही विरोधी पक्षाच्या कुठल्याही आमदाराला नोटीस पाठवत नव्हतो. मी चूक मान्य करतो, राजकारण आपल्याला जमलं नाही, म्हणून आपलं सरकार गेलं. त्यांचे अजून फोडण्यासाठी पदाधिकाऱ्यांना फोन सुरू आहेत, आमच्याकडे या म्हणून. पण आपण थांबलो नाही, समाजकारण सुरू आहे. मुंबईला आपण महत्व देण्याचा प्रयत्न केला, जे इतर कोणत्याही सरकारने अद्याप दिलं नव्हतं.
सगळे म्हणतात की, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, पण ही जबाबदारी मी घेतोय, जगाला सांगण्यासाठी की चांगल्या लोकांना राजकारणात स्थान असतं. गद्दारांनी कितीही गट केले, नावं लावली, तरी गद्दार ते गद्दारच राहणार. आम्ही कधीही विधान भवनात कधी गेलो नव्हतो, पण गेल्यावर यांचे धंदे आम्ही बघितले, म्हणून त्यांच्या पोटात दुखत असावं, अशी पोलखोलही आदित्य ठाकरे यांवी केली.
उद्धव साहेबांच्या दोन सर्जरी झाली, तेव्हा यांनी आमदारांची जमवाजमव केली. ज्या माणसाने आपल्याला ओळख दिली, मंत्री खाती दिली, त्या माणसाची दोनदा सर्जरी झाली होती, ते भेटू शकत नव्हते हे खरं आहे, पण तेव्हा यांनी जमवाजमव सुरू केली. पक्ष प्रमुखांना कोविड होतो, तेव्हा हे लोक पळून गेले. बंडखोर नाहीत, ते गद्दार आहेत. सुरतला गेले, तिथून गुवाहाटीला गेले, मज्जा सुरू होती, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.