Sanjay Raut and Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

दारूच्या होम डिलिव्हरीचं धोरण फडणवीसांचेच! राऊतांनी भाजपला पाडलं तोंडावर

राज्य सरकारने वाईन (Wine) दुकानांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात आता भाजपने जोरदार टीका केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्य सरकारने वाईन (Wine) दुकानांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयाच्या विरोधात बाजू मांडली. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच दारुच्या होम डिलिव्हरीचे धोरण राज्यात आणले होते, हे समोर आणून शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपला तोंडावर पाडले आहे.

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दारूला औषधाचा दर्जा दिला होता, याचा दाखलाही राऊत यांनी देऊन भाजपला तोंडघशी पाडले आहे. राऊत म्हणाले की, आधीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दारुच्या ऑनलाईन होम डिलिव्हरीचे धोरण आखले होते. त्यावेळी हा निर्णय कुणी घेतला होता? भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दारूला औषध म्हटले आहे. याचबरोबर साध्वींनी कमी प्रमाणात दारू पिण्याचीही सल्ला दिला होता.

वाईन विक्रीवरुन फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले होते. पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, असा टोला त्यांनी लगावला होता. ते म्हणाले होते की, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच! महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या 'नशे'त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी.

आशिष शेलार यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, ठाकरे सरकारचे मद्यप्रेम यापूर्वी वारंवार दिसून आले होतेच. आता किराणा मालाच्या दुकानात दारु विकण्याची परवानगी दिली आहे. पब, पेग, पार्टी आणि दारु याबाबत 'अतिसंवेदनशील' असणाऱ्या ठाकरे सरकारने भविष्यात नळाव्दारे 24×7 घरोघरी दारु उपलब्ध करुन दिली तरी नवल वाटू नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT