
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली असून, त्यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरूंगात आहे. आता त्यांचा पाय खोलात गेला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात त्यांनी धक्कादायक दावा केला आहे.
मुख्य सचिव म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कुंटे निवृत्त झाले आहेत. यानंतर त्यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे. कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. आता त्यांनीच ईडीसमोर नोंदवलेल्या जबाबात देशमुखांबाबत गौप्यस्फोट केला आहे. देशमुखांवरील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांबाबत ईडीने अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले होते. यात कुंटे यांचाही जबाब नोंदवला होता.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात देशमुख माझ्याकडे अनधिकृत याद्या पाठवत होते, असा खळबळजनक दावा कुंटेंनी ईडीसमोर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशमुख गृहमंत्री असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी याद्या पाठवायचे. यावर कुठल्या अधिकाऱ्याची कुठे बदली करायची याचा उल्लेख असायचा. देशमुखांचा स्वीय सहाय्यक संजीव पालांडे हा याद्या पोचवायचा. देशमुख हे गृहमंत्री असल्याने मी यासाठी नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मी बदल्या करीत होतो.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला अटक केली होती. या प्रकरणी देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.
करचुकवेगिरी प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्याने डिफॉल्ट जामीन मंजूर करावा, अशी मागणी देशमुखांनी नुकतीच विशेष न्यायालयाकडे केली होती. यासाठी देशमुखांनी 4 जानेवारीला विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ईडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली. देशमुख हे गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होती. तब्बल 12 तास चौकशी झाल्यानंतर त्यांना त्याचदिवशी अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरूंगात आहेत.
देशमुखांच्या विरोधात तब्बल 7 हजार पानांचे आरोपपत्र ईडीकडून दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) प्राथमिक तपासात देशमुखांना क्लीन चिट दिल्याचा अहवाल फोडल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयच्या आरोपपत्रात देशमुख यांना आरोपी बनवलेले नसले तरी ते मोठ्या कटाचा भाग असू शकतात. कारण, त्यांना या प्रकरणातील माहिती लीक झाल्याचा सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसत आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.