Santosh Kadam, Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena Politics : संतोष-प्राची यांचे 'कदम' पुन्हा 'मातोश्री'मधून 'वर्षा'वर; अधिवेशनापूर्वीच ठाकरेंना शिंदेंकडून धक्का

Santosh Kadam Back To Shide Gat : ठाकरे गटात प्रवेश केलेले भायखळ्याचे संतोष आणि प्राची कदम 15 दिवसांत पुन्हा शिंदे गटात...

सरकारनामा ब्यूरो

हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणारे संतोष कदम आणि प्राची कदम यांनी अवघ्या 15 दिवसांत घुमजाव केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. असे काय घडले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून ठाकरे गटात आलेले संतोष आणि प्राची कदम पुन्हा शिंदेंसोबत गेले, याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.

संतोष कदम हे मुंबईतील भायखळा विभागात शिवसेनेचे पदाधिकारी होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी अचानक ठाकरे गटात प्रवेश केला. संतोष कदम, प्राची कदम हे भायखळ्यातील मोठे प्रस्थ आहे. त्यांच्यासोबत ज्योती पाटील, रेहान खंडवानी, मानसी सकपाळ, अमित खानविलकर, रेश्मा काळे, अमित खानविलकर, प्रिया कदम, विजय पवार, चैतन्य पाटील आदी अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात गेल्याने तो शिंदे गटाला धक्का मानला जात होता.

मात्र, पडद्यामागून अचानक सूत्रे हलली. शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी मध्यस्थी करत संतोष कदम आणि प्राची कदम यांची नाराजी दूर केली. त्यानंतर दोघांनी काल पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. अगदी 15 दिवसांत ठाकरे गटात आलेले पदाधिकारी पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने ही थेट उद्धव ठाकरेंवर मात मानली जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यशवंत जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना भायखळ्यात कमजोर झाली आहे. त्यामुळेच संतोष कदम आणि प्राची कदम यांचा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा दिलासा देणारा होता. पण ठाकरे गटाचा हा आनंद अवघे 15 दिवसच टिकला.

दरम्यान, अंतर्गत गटबाजीमुळे संतोष कदम यांनी शिंदे गटाला 'जय महाराष्ट्र' केल्याचे कळल्यानंतर यशवंत जाधव यांनी त्या पदाधिकाऱ्याला समज दिल्याचे कळते. ही नाराजी काय स्वरुपाची होती, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच कदम यांच्या माघारीनंतर त्यांना बढती मिळणार का, हेही अजून गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, संतोष कदम यांची नाराजी दूर करण्यात आणि त्यांना पुन्हा शिंदे गटात आणण्यात यशवंत जाधव यांना यश आल्याने ठाकरे गटाची जिरवल्याची भावना शिंदे गटातील पदाधिकारी, नेत्यांमध्ये सध्या आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT