Shivsena Shkha Dombivali
Shivsena Shkha Dombivali Sarkarnma
मुंबई

Shivsena : शासनाकडून शिवसेनेचं शाखा कार्यालय जमीनदोस्त : शिवसैनिक संतप्त!

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : दहिसर येथील शिवसेनेची शाखा अनधिकृत असल्याचे कारण देत महसूल विभागाने जमीनदोस्त केली. यासाठी शिंदे गटाचा पाठिंबा असून, ठाकरे गटात मात्र नाराजीचे वातावरण आहे. शिवसेना प्रमुखांनी या शाखा उभारल्या होत्या. शिवसैनिक म्हणून काम करताना यांना शाखा अधिकृत वाटली, आता अनधिकृत वाटत आहे, आता ते शिवसैनिक नाहीत, असा सणसणीत टोला ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी लगावला.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावातील मुख्य दहिसर विभागीय शाखा महसूल विभागाने गुरुवारी जमीनदोस्त केली. शाखा अनधिकृत असल्याचे कारण देत महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. मात्र त्याच शाखेच्या परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई शासनाकडून करण्यात आलेली नाही. केवळ शिवसेनेची शाखा तोडल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये शिंदे गटाच्या विरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी गावागावात शाखा सुरू केल्या होत्या. आज याच शाखांवर हातोडा फिरवला जात आहे. दहिसर नाक्यावर असलेली शिवसेनेची शाखा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सुरु झालेली होती. शिवसेनेचे तत्कालीन दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी देखील या शाखेला भेटी दिल्या होत्या. मात्र याच शाखेवर शासनाकडून कारवाई करण्यात आल्याने शिवसैनिकांच्या ते जिव्हारी लागले आहे.

शासनाच्या या कारवाई नंतर ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी नाराजी व्यक्त केली. भोईर याविषयी म्हणाले की, मला वाटत ही दुर्देवी घटना आहे. हा काळा दिवस माझ्या माहिती प्रमाणे आहे. कारण ज्या शिवसैनिकांनी, ज्या शाखा प्रमुखांनी त्या शाखा उभारल्या होत्या. त्या भागातील शेतकऱ्यांनी ज्यांना निवडून दिले, त्यावेळस सर्व शिवसैनिकच म्हणून काम करत होते. आणि तेव्हा त्यांना यासर्व शाखा अधिकृत वाटत होत्या. मात्र आज अनधिकृत वाटत आहे. हे एकप्रकारच राजकारणच आहे असं मला वाटतंय.

सर्व्हे नं. 63 यांच्यामध्ये आमची शिवसेनेची शाखा गेली 40 वर्ष पासून आहे.त्यांच्याखाली केंद्र शासनाचे पोस्ट ऑफिस होते, बाजूला ग्रामपंचायत च कार्यालय आणि त्यांच्यावरती सरपंचाचं कार्यालय आहे, असं असताना सुद्धा फक्त शिवसेनेची शाखा तोडली जाते. याचा अर्थ हे राजकारण आहे, त्यावेळेस ते शिवसैनिक होते. आता ते शिवसैनिक नाही, अशा पध्दतीचं हे राजकारण दुर्दैवी आहे. पण अशा प्रकारचं राजकारण करून, तुम्ही ज्यागोष्टी मध्ये विष पेरलंय त्यामुळे हा चिडलेला शिवसैनिक कधी माफ करणार नाही, अशी शिवसैनिकांची भावना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT