Dada Bhuse Sarkarnama
मुंबई

TET Paper Leak Case : टीईटी पेपर फुटीप्रकरणी शिक्षण मंत्र्यांची घोषणा : तपासासाठी SITची चार पथके रवाना, आरोपींना मकोका

Education Minister Dada Bhuse Statement : टीईटी पेपर फुटीप्रकरणी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. तपासासाठी चार पथके विविध राज्यांत रवाना झाली असून आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा दादा भुसे यांनी केली.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 29 June : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटीप्रकरणी राज्य सरकारने ठाण्याचे पोलिस सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी बिहार, दिल्ली आणि हरियाणाला चार पथके रवाना झाली आहेत. तसेच, यातील आरोपींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी टीईटी पेपर फुटीप्रकरणी आज विधानसभेत निवेदन सादर केले. त्यात त्यांनी चौकशीसाठी एसआयटी नेमल्याची आणि आरोपींवर मकोका लावण्याबाबतची माहिती दिली. या वेळी त्यांनी घडलेला सर्व प्रकार विधानसभेत सांगितला.

मंत्री भुसे म्हणाले, टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका विकण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती पोलिसांना २७ जून रोजी मिळाली होती. माहितीची खातरजमा करून प्रश्नपत्रिका विक्रीसाठी येणाऱ्या तीन व्यक्तींना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २८ जून रोजी होणाऱ्या टीईटीचे पेपर आढळून आले.

याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खात्री केली असता ती २८ जून रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याचे समजले. त्यामुळे राजीव श्री प्रयाग शॉ व इतर दोघांविरुद्ध टीईटी पेपर फुटीप्रकरणी २७ जून रोजी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, पेपर फुटीप्रकरणी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तीन आरोपींना २७ जून रोजी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता पोलिस महासंचालकांच्या आदेशान्वये ठाणे शहर पोलिस सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आली आहे. एसआयटीकडून तपास सुरू असून तपासासाठी बिहाराला दोन, तर दिल्ली आणि हरियाणाला प्रत्येकी एक पथक रवाना करण्यात आले आहे.

टीईटी पेपर फुटीप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. टीईटी पेपर फुटीप्रकरणी जे कोणी दोषी आढळतील, त्या सर्वांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) गुन्हा नोंदविण्याबाबत कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

टीईटी पुढील वर्षीपासून ऑनलाईन होणार

टीईटीची पेरपरीक्षा पारदर्शीपणे शिस्तबद्ध वातावरणात घेण्यात येईल. फेरपरीक्षेसाठी परीक्षार्थींकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कारण ते अगोदरच स्वीकारण्यात आलेले आहे. पुढील वर्षापासून टीईटी व इतर सर्व परीक्षा पादर्शक आणि शिस्तपद्धत वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT