

Mumbai, 29 June : पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या भीमराव कांबळे याला आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर विधानसभेत निवेदन सादर केले. त्यात न्यायाधीशांनी सुटी न घेता सलग काम करत अवघ्या ५५ दिवसांत निकाल दिला, त्याबद्दल न्यायाधीश, पुणे जिल्हा पोलिसांचे विशेष आभार मानले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नसरापूर (ता. भोर) येथे एक मे २०२६ रोजी तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी ०२ मे रोजी एफआयर दाखल झाला आणि आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी केवळ १४ दिवसांत म्हणजे १६ मे रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतर २८ मे रोजी न्यायालयासमोर आरोप निश्चिती झाली. पहिली साक्ष २६ मे रोजी नोंदविण्यात आली आणि केवळ १६ दिवसांत ५५ साक्षीदारांची तपासणी-उलटतपासणी करण्यात आली. त्यानंतर २५ जूनला संबंधित आरोपीला दोषी ठरविण्यात आले. घटना घडल्यापासून अवघ्या ५५ व्या दिवशी आरोपीला दोषी ठरवलं आणि त्यानंतर २९ जून रोजी म्हणजेच आज आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा दिलेली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, केवळ २९ दिवसांत ५५ साक्षीदार तपासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. याबाबद्दल न्यायालयाचे विशेष आभार मानतो. कारण, चार्जशीट दाखल करेपर्यंत टाईमलाईन पोलिसांच्या हातात असते. त्यानंतर मुख्यत्वे ती न्यायालयाच्या हाती असते. या प्रकरणी न्यायमूर्ती एस. आर. साळुंखे यांचे मी विशेष आभार मानतो. कारण त्यांनी आपल्या सुट्या रद्द केल्या आणि सलगपणे या खटल्याची सुनावणी घेतली.
खरं म्हणजे अशा प्रकारच्या नराधमांवर कारवाई करायची असेल आणि त्या कारवाईचा जरब बसवायचा असेल तर वेळेत न्याय मिळणं, हे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात न्यायालयाने स्वतः एक नवीन उदाहारण आपल्यापुढं मांडलं आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करेन. पोलिसांनी अतिशय उत्तम प्रकारे पुरावे जमा केले. सगळे पुरावे योग्य पद्धतीने ॲप्रिसिएट झाले. या सर्व पुराव्याच्या आधारावर ही केस प्रू करू शकलो. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनीही योग्य पद्धतीने मांडणी केली. त्यातून एक बेंचमार्क तयार झालेला आहे.
अशा घटना घडू नयेत, अशी आपली सर्वांची इच्छा आहे. पण समाजातील काही प्रवृत्ती कधी ना कधी डोके वर काढतात. या प्रकरणामुळे आपल्याला अनुभव आला आहे की, वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना कमीत कमी वेळेत दोन महिन्याच्या आतमध्ये ५९ दिवसांत फाशीपर्यंत पोचवता येतं. त्यासाठी न्यायालय, वकील, पोलिस यांचे अभिनंदन करतो.
पीडितांच्या पालकाचे दुःख आपण कमी करू शकत नसलो तरी त्यांना समाधान असेल की अशा नराधमांना तिहेरी फाशीची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. यापुढे अशाच पद्धतीने वेगाने काम करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.