<div class="paragraphs"><p>Rupali Chakankar, Gulabrao Patil</p></div>

Rupali Chakankar, Gulabrao Patil

 
मुंबई

गुलाबराव पाटलांना 'ते' वक्तव्य भोवणार! महिला आयोगानं दिला थेट इशारा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याविषयीचं वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. आपल्या मतदारसंघातील रस्ते हे हेमा मालिनी यांच्या गालासारखे आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली होती. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.

पाटील यांच्या वक्तव्याची आता राज्य महिला आयोगानंही (State Women Commission) दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी थेट गुलाबराव पाटील यांना इशारा दिला आहे. 'एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अशाप्रकारचे वक्तव्य करणं निषेधार्ह आहे. एखाद्या गोष्टीची तुलना ही महिलांच्या रंगरुपाशी करणं, ही संस्कार आणि संस्कृती अतिशय नीच पातळीची आहे,' अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

आपण महिलांना दुय्यम वागणूक देताय, हे चुकीचे आहे. त्यामुळे आपण केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी, अन्यथा आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. राज्य महिला आयोगाकडून याची दखल घेत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

गुलाबराव पाटील यांनी एका प्रचारसभेत म्हटलं होतं की, 'हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही तयार केले आहेत.' या वक्तव्यावरून चित्रा वाघ संतापल्या असून त्यांनी पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. वाघ यांनी याबाबत ट्विट करत म्हटलं आहे की, गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील...शिवसेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतानंतर आत्ता गुलाबराव पाटील. त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं.

गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली. गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार? शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही, अशी टीका वाघ यांनी केली आहे.

मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा.. नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही वाघ यांनी दिला आहे. पाटील म्हणाले म्हणाले, 'गेली ३० वर्षे ते या भागातले आमदार आहेत. पण साधे रस्ते ते चांगले करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT