Maharashtra Assembly News : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षालाच अडचणीत आणले. पक्षाचा २०१९ चा जाहीरनामा आणि मागील अधिवेशनातील अशासकीय ठरावाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी थेट मंत्र्यांविरोधातच हक्कभंग मांडला.
मुनगंटीवार यांनी मागील अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावकर यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याबाबतचा अशासकीय ठराव विधानसभेत मांडला होता. त्यावर मंगळवारी बोलताना ते म्हणाले, ५ मार्च २०२६ रोजी विधानसभेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्याबाबत अशासकीय ठराव मांडला होता. त्यावेळी मंत्र्यांनी विधानसभेत ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविला जाईल, असे सांगितले होते.
आपण केंद्रात भेटून आल्याचे सांगत त्यांनी तिथपर्यंत हा ठराव गेलाच नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मी केंद्रात जाऊन भेटूनही आलो. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या राष्ट्रभक्तांबाबत यामध्ये कोणतेही पैसे मागितले नाहीत. फक्त ठराव करायचा आहे. यामध्ये भावनेचा आदर करायचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जी जाज्वल्य राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली त्या राष्ट्रभक्त सावरकरांचा भारतरत्नचा प्रस्ताव आपल्याला पाठवायचा आहे, असे सुधीर मुनगंटीवर संतापून म्हणाले.
२०१९ च्या भाजपच्या जाहीरनाम्यात सुध्दा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतचा ठराव विधानसभेत केला जाईल, असे सांगितले होते. म्हणून मी अशासकीय ठराव मांडला. जाहीरनाम्यात देऊनही आणि ५ मार्च ते २३ जून आमच्या नस्ती जर पुढे जाणार नसतील तर अध्यक्षांनी माझा हा हक्कभंग स्वीकारावा, अशी विनंती मुनगंटीवार यांनी केली.
आपले नियम असे आहेत की, आपण मंत्र्यांवर हक्कभंग टाकतो, हाही बदल केला पाहिजे. मंत्र्यांची इच्छा असते, अधिकारी त्या नस्तीवर असे बसतात की एखादी कोंबडी बसली म्हणून अंडी उबवून त्यातून पिल्लं निघावित, अशा दहा नस्त्या त्यातून तयार होतील. हक्कभंग स्वीकारावा. मी जरी मंत्र्यांविरोधात मांडत असलो तरी अधिकाऱ्यांच्या विरोधात तो स्वीकारावा, असे मुनगंटीवार म्हणाले. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुनगंटीवार यांना आश्वासन समितीकडे याबाबत याचिका करण्यास सांगितले. त्यावर मुनगंटीवार यांनी अधिकारी आश्वासन समितीला मोजतच नाहीत, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.