Sunetra Pawar Meeting | NCP Internal Clash | Tatkare Bhujbal Sarkarnama
मुंबई

NCP Internal Clash : राष्ट्रवादीच्या बैठकीत 'हायहोल्टेज ड्रामा'; भुजबळ-तटकरेंमध्ये खडाजंगी, पार्थ पवारांचा काढता पाय... वाचा इनसाईड स्टोरी

NCP Sunetra Pawar Meeting : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही नेत्यांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊ न दिल्याचा तसंच त्यांनी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला जात होता.

Jagdish Patil

Mumbai News, 27 May : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या 'देवगिरी' निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगळवारी (ता.२६) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जेष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे या दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याने ही बैठक चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर राहिल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही नेत्यांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊ न दिल्याचा तसंच त्यांनी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला जात होता. यावरून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात होती.

हीच मनातील सर्व खदखद तटकरे यांनी कालच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर बोलून दाखवली आहे. "अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणं, पक्ष एकसंध ठेवण्यात मी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्यानंतर आमच्यावर टीका सुरु झाली तेव्हा पक्षाचा एकही आमदार, नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही", अशी खंत तटकरेंनी बोलून दाखवली.

शिवाय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुनही मी आणि पटेल दोघेच टीकेचे धनी झालो तेव्हाही पक्षातील कोणीही आमची बाजू मांडण्याचा किंवा बचाव करण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही ते म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. तटकरे पक्षाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत असतानाच मंत्री भुजबळ यांनी हस्तक्षेप केला आणि जे झालं ते झालं, आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जाण्याची गरज असल्याचं सांगितलं.

मात्र, याच मुद्द्यावरून तटकरे आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय तटकरे बोलण्यासाठी उभे राहिले त्यापूर्वीच पार्थ पवार हे तडकाफडकी बैठकीतून निघून गेल्याची माहितीही सुत्रांनी दिली. दरम्यान, तटकरे बोलत असताना भुजबळांनी आपल्याला महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला जायचे असून भाषण आवरते घ्या, असं सांगितलं.

पण भुजबळांकडे दुर्लक्ष करत तटकरेंनी आपले मुद्दे मांडणे सुरूच ठेवलं. त्यामुळे बैठकीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तर या सर्व प्रकरणानंतर पक्षात एकजूट महत्त्वाची असून सर्वांनी एकाच आवाजात बोलले पाहिजे, असा संदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमदारांना दिल्याचंही सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT