Sushil Raheja 
मुंबई

Sushil Raheja: मुजोर बिल्डर सुशील रहेजाविरोधात आंदोलन पेटलं! अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी वंचित, मनसेनंतर आता काँग्रेसही आक्रमक

Sushil Raheja: मुंबईच्या चेंबूरस्थित बिल्डर सुशील राहेजा यानं आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सध्या वातावरण चांगलचं तापलं आहे.

Amit Ujagare

Sushil Raheja: मुंबईच्या चेंबूरस्थित बिल्डर सुशील राहेजा यानं आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सध्या वातावरण चांगलचं तापलं आहे. याप्रकरणी बिल्डरविरोधात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अर्थात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पण तरीही त्याच्यावर पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी आणि मनसेनंतर आता काँग्रेस पक्षानं मोठ पाऊल उचललं आहे.

वंचितचा कार्यालयात घुसून तोडफोड

याप्रकरणी यापूर्वी वंचित बहुजन आघाडीनं बिल्डर सुशील राहेजा याच्या कार्यालयात घुसून राडा घातला होता. जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्या ऑफिसची हॉकी स्टीकनं वंचितच्या महिला कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. यानंतर संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यातही घेतलं. पण राहेजा याच्या कृत्यावर सर्वच स्तरातून टीका व्हायला लागली आहे. पण त्यानं अद्याप याप्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं नाही.

मनसेचा भाजपवर निशाणा

याप्रकरणात मनसेनं देखील उडी घेतली असून यातील मराठी-अमराठी या वादावर मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, “तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत… मुंबईतील बिल्डर सुशील रहेजाकडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ… भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची… केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे…आता पाहूया आशिष शेलार, साटम आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो… मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण… या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत…!!! बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच…!!! अशा शब्दांत गजानन काळे यांनी राहेजा बिल्डरला इशाराही दिला आहे.

काँग्रेसही झाली आक्रमक

दरम्यान, आता काँग्रेसही या बिल्डरविरोधात आक्रमक झाली असून काँग्रेसचे कार्यकर्ते देखील राहेजाच्या कार्यालयात धडक देण्याच्या तयारीत होते. इथं जाऊन बिल्डर सुशील राहेजा याला 'संविधाना'ची प्रत भेट देऊ त्याच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसकडून निदर्शने करण्यात येणार होते, पण तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या या बिल्डरविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळं काँग्रेसकडून हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला, अशी माहिती काँग्रसचे दक्षिण-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष कचरू यादव यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

बिल्डर सुशील राहेजा याच्या ऑफिसमध्ये कामाला असलेल्या बौद्ध समाजाच्या राहुल जाधव नामक एका तरुणाला कागदपत्रे व्यवस्थित स्टेपल न केल्याच्या किरकोळ कारणावरुन इतर सर्व कर्मचाऱ्यांसमोर मारहाण केली. तसंच "तुम घाटी लोग, जयभीमवाले कभी सुधरोगे नही" अशा शब्दांत जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप सुशील राहेजा याच्यावर आहे. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात राहेजाच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत १० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमानुसार तात्काळ आरोपीवर कारवाई करण्याची तरतूद आहे. पण बिल्डरवर अद्याप कुठलीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT